Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जनगणनेच्या कार्यात नागरिकांना प्रत्यक्ष सहभागाची संधी;




देशातील पहिल्या 'डिजिटल जनगणने'साठी अमरावती जिल्हा सज्ज;

'स्व-गणना'  सुविधेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

            अमरावती , दि. २५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : भारताची लोकसंख्या गणना २०२७ मध्ये घेण्याचा निर्णय जाहीर झाला असून यावेळची जनगणना ही स्वतंत्र भारताची आठवी आणि २१ व्या शतकातील तिसरी जनगणना असणार आहे. विशेष म्हणजे ही भारताची पहिली 'डिजिटल जनगणना' असेल. या ऐतिहासिक प्रक्रियेत नागरिकांना प्रत्यक्ष सहभाग नोंदवता यावा यासाठी 'स्व-गणना' (Self-Enumeration) ही सुविधा पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आली असून, अमरावती जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पत्रकार परिषदेत केले. 

      ही जनगणना दोन स्वतंत्र टप्प्यात पार पडणार असून पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना, तर दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या गणना केली जाईल. स्व-गणनेसाठी १ मे २०२६ ते १५ मे २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. नागरिकांनी शासनाच्या अधिकृत https://se.census.gov.in या वेबपार्टलवर आपल्या मोबाईल किंवा संगणकावरून कुटुंबाची माहिती भरायची आहे. यासाठी आधार कार्ड किंवा मोबाईल नंबरच्या आधारे लॉगिन करून एकूण ३३ प्रश्नांची अचूक उत्तरे देणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय असून नागरिकांनी कोणत्याही क्यूआर (QR) कोड स्कॅन करू नये किंवा बँक खाते, पॅन कार्डचा तपशील कोणालाही देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

   अमरावती जिल्ह्याच्या नियोजनाबाबत सांगायचे झाले तर, ग्रामीण व शहरी भागात एकूण ४,४९९ घरयादी गट बनविण्यात आले आहेत. या कार्यासाठी ६८ क्षेत्र प्रशिक्षक, ४,६३९ प्रगणक आणि ८१३ पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यांचे प्रशिक्षण सध्या सुरू आहे. जे नागरिक तंत्रज्ञान वापरू शकत नाहीत किंवा ज्यांनी स्व-गणना केलेली नाही, त्यांच्यासाठी प्रशिक्षित प्रगणक १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत प्रत्येक घरी भेट देऊन ॲपद्वारे माहितीची नोंद करतील. ज्यांनी आधीच स्व-गणना केली आहे, त्यांनी प्रगणकांना फक्त आपला 'SE ID' द्यावा. 

            जनगणनेतून मिळणारी आकडेवारी पुढील १० वर्षांसाठी शाळा, दवाखाने, पाणीपुरवठा आणि रोजगार यांसारख्या विविध विकास आराखड्यांचे नियोजन ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी, विशेषतः सुशिक्षित तरुणांनी पुढाकार घेऊन या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. काही तांत्रिक अडचण आल्यास स्थानिक तहसील कार्यालय किंवा नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधावा.


Post a Comment

0 Comments