जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आधार अपडेट प्रलंबित; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, February 20, 2026

जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आधार अपडेट प्रलंबित;



कर्जमाफीच्या लाभासाठी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन

अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): राज्य शासनाकडून शेती क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी प्रस्तावित कर्ज निवारण योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, अमरावती जिल्ह्यातील थकीत कर्जदार शेतकरी सभासदांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील सुमारे 3 हजार 294 शेतकरी सभासदांचे आधार क्रमांक प्राप्त झाले नसल्याने त्यांच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेत तांत्रिक अडथळा निर्माण झाला आहे.

शासनाच्या प्रस्तावित कर्जमाफी पोर्टलवर अमरावती जिल्ह्यातील एकूण 73 हजार 413 खाती नोंदवण्यात आली आहेत. यापैकी प्राथमिक कृषी पत पुरवठा सेवा सहकारी संस्थांचे 1 हजार 450 थकीत कर्जदार आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा स्तरावरील 1 हजार 844 कर्जदार अशा एकूण 3 हजार 294 सभासदांची आधार कार्ड माहिती अद्याप अप्राप्त आहे. विहित नमुना प्रपत्र 'अ' व 'ब' मध्ये ही माहिती भरण्याचे काम सध्या सेवा सहकारी संस्था आणि बँक स्तरावर सुरू आहे.

ज्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक प्रलंबित आहेत, त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्यांना प्रस्तावित योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील संबंधित सर्व शेतकरी सभासदांनी आपल्या संस्थेचे सचिव, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसुली अधिकारी किंवा तालुका उप/सहायक निबंधक कार्यालयाशी तातडीने संपर्क साधावा. संपर्काच्या वेळी आपले आधार कार्ड व आवश्यक कागदपत्रे सादर करून आपली माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन विभागीय सहनिबंधक आणि जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages