छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व आणि विचार आजही सुसंगत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, February 20, 2026

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व आणि विचार आजही सुसंगत








*शिवजयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे विशेष व्याख्यान

*शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

           अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमरावती जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या विशेष व्याख्यानाचे आयोजन नियोजन भवन येथे करण्यात आले होते. यावेळी वक्ते प्रा. प्रेमकुमार बोके तसेच डॉ. वैभव मस्के यांनी शिवरायांची विचारधारा, व्यवस्थापन कौशल्य, कार्यकर्तृत्व, त्यांचे शौर्य तसे त्यांचे आजही सुसंगत असलेले विचार यांची यावेळी उपस्थितांना माहिती दिली.

            अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे संचालक श्रीकांत पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, तहसीलदार विजय लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते.

            प्रेमकुमार बोके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंविषयी माहिती दिली. रयतेची काळजी घेणारा, दुष्काळाच्या काळात राज्याची तिजोरी रयतेसाठी खुली करणारा, स्त्रियांचा आदर करणारा, दूरदृष्टी व सूक्ष्म नियोजनात तरबेज, शेत जमिनीची मोजणी करणारा पहिला राजा ते आधुनिक विचारधारा अंगी कारणारा राजा अशा विविध पैलूंवर त्यांनी दाखल्यांसह माहिती दिली.

        वैभव मस्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची विविध दाखल्यांसह माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीकोन, गुणग्राहकता, उत्तम व्यवस्थापन आणि सर्वधर्मसमभाव वृत्ती, त्यांची प्रसंगावधानता ही विविध प्रसंगातून त्यांनी यावेळी व्यक्त केली.

     शहरात शिवजयंतीच्या दिवशी, म्हणजे काल, 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता भीमटेकडी येथून भव्य बाईक रॅली काढण्यात आली आहे. ही रॅली यशोदा नगर चौक, कल्याण नगर चौक, राजापेठ उड्डाणपूल, राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक, चित्रा चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक अशा मुख्य मार्गावरून जात शिवटेकडी येथील शिवाजी महाराज पुतळ्यापाशी विसर्जित झाली. या रॅलीचे खास आकर्षण म्हणजे मार्गातील ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम झालेले दिसून आले. राजकमल चौक, इर्विन चौक आणि माँ जिजाऊ पुतळा परिसर येथे शिवरायांच्या जीवनावर आधारित पथनाट्य सादर केले गेले . तसेच माँ जिजाऊंच्या पुतळ्याजवळ वीररसातील पोवाड्याचे सादरीकरण करून शिवरायांना मानवंदना दिली. या सर्व कार्यक्रमांमध्ये अमरावतीकर  मोठ्या संख्येने सहभागी झाले, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांनी प्रास्ताविकेतून केले.

कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी तर आभार नायब तहसीलदार श्री रासेकर यांनी मानले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages