*शेतकऱ्यांना सचिवांकडे कागदपत्रे देण्याचे आवाहन
अमरावती, दि. १० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थांचे थकीत कर्जदार शेतकरी सभासदांनी अद्यापही आधार कार्ड, फार्मर आयडी आणि इतर आवश्यक असलेली माहिती संबंधित सेवा सहकारी संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेला उपलब्ध करून दिलेली नसल्यास या सर्व शेतकरी सभासदांनी तातडीने उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासनाने शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने प्रस्तावित कर्ज निवारण योजनेसंदर्भात माहिती मागविली आहे. याअनुषंगाने थकीत कर्जदार सभासदांची माहिती संकलित करुन विहीत नमुना प्रपत्र अ व ब मध्ये तयार करण्याचे काम संबंधित प्राथमिक कृषी पतपुरवठा सेवा सहकारी संस्था, तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा स्तरावर सुरु आहे.
त्यानुसार सेवा सहकारी संस्थांचे थकीत सभासदांचे कर्ज खाते आणि इतर अनुषांगिक माहिती संकलित करण्याचे काम संस्था पातळीवर सुरु आहे. सेवा सहकारी संस्थांचे थकीत कर्ज असलेल्या सभासदांनी संबंधित सहकारी संस्थेच्या सचिवाशी संपर्क करुन त्यांचे आधार कार्ड, फार्मर आयडी आणि इतर आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करुन दिलेली नाही, त्यामुळे सदर माहितीचे संकलन संस्था पातळीवर करता आले नाही. त्यामुळे सर्व शेतकरी सभासदांनी संबंधित संस्थेचे सचिव, किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेचे वसुली अधिकारी यांच्याशी त्वरीत संपर्क करुन आधारकार्ड आणि आवश्यक माहिती उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था शंकर कुंभार यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments