अमरावती विभागात राबविणार “महारेशीम अभियान–२०२६” - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, February 9, 2026

अमरावती विभागात राबविणार “महारेशीम अभियान–२०२६”

  दिनांक: १० फेब्रुवारी 2026





४ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान पाच जिल्ह्यांत रेशीम शेतीसाठी व्यापक जनजागृती

अमरावती दि १० : शेतकऱ्यांना हमखास व शाश्वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीचा विस्तार व्हावा, तसेच रेशीम उद्योगाबाबत व्यापक जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने राज्य शासनाच्या मान्यतेने अमरावती विभागात “महारेशीम अभियान–२०२६” राबविण्यात येणार आहे. हे अभियान दि. ४ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलढाणा या पाच जिल्ह्यांत राबविले जाणार आहे. या अभियानातून ‘रेशीम शेतीचे फायदे व शासनाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणर आहे. असे रेशीम विभागाव्दारे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

            राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण २०२३–२८ अन्वये रेशीम शेती व त्या आधारीत पूरक उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्याच अनुषंगाने हे अभियान राबविले जात आहे. अभियानादरम्यान रेशीम शेतीचे महत्त्व, तुती लागवड, टसर रेशीम उत्पादन, तसेच रेशीम उद्योगातून मिळणाऱ्या आर्थिक लाभांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

            अमरावती विभागात रेशीम उद्योगाचा विस्तार होण्याच्या दृष्टीने जिल्हा रेशीम कार्यालयांमार्फत गावनिहाय व समूह निहाय नियोजन करण्यात येणार असून, ज्या गावांत तुती लागवडीचे क्षेत्र अस्तित्वात आहे अशाच गावांत किंवा शेतकरी इच्छुक असल्यास लगतच्या गावांत अभियान राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांना रेशीम शेतीकडे वळविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

            महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत रेशीम संचालनालयामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध असून, अभियान कालावधीत त्याची व्यापक प्रसिद्धी करण्यात येणार आहे. नवीन शेतकरी व उद्योजकांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

            अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा रेशीम कार्यालयांनी कृषी विभाग, जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्याशी समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. “महारेशीम अभियान–२०२६” मुळे अमरावती विभागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून रेशीम उद्योगाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages