अमरावती, दि. ९ : आदिवासी विकास महामंडळाच्या धारणी कार्यालयामार्फत खरीप पणन हंगाम 2025-26 मध्ये शासनाच्या किंमत समर्थन योजनेंतर्गत धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून एफएक्यू दर्जाचे ज्वारी, बाजरी, मका, रागी भरडधान्य खरेदी करण्यात येत आहे. यात आतापर्यंत 888 क्विंटल मका खरेदी करण्यात आली आहे.
हमी भावाने धान्य खरेदीसाठी नोंदणी कालावधी हा दि. 15 डिसेंबरपर्यंत राहणार असून खरीदी दि. 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. महामंडळाकडे आतापर्यंत एक हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली असून त्यापैकी 248 शेतकऱ्यांकडून 888.40 क्विंटल मका खरेदी करण्यात आली आहे.
जिल्ह्यात धारणी उप प्रादेशिक कार्यालयांतर्गत बैरागड, सावलिखेड़ा, साद्राबाडी, चाकर्दा, हरीसाल, धारणी आणि चिखलदरा अंतर्गत चुरणी, गोलखेडा बाजार येथे खरेदी केंद्र सुरू आहे.
खरेदी केंद्रावर धान्य आणण्यापूर्वी व्यवस्थितरीत्या वाळवून, स्वच्छ करून आणावे, तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे घेऊन राज्य शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक व्यवस्थापक संतोष आमटे यांनी केले आहे.