चांदूरबाजारमध्ये मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; निकालाची प्रतीक्षा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, December 2, 2025

चांदूरबाजारमध्ये मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; निकालाची प्रतीक्षा

  • चांदूरबाजार नगरपरिषदेच्या मतदानाला प्रचंड प्रतिसाद
  • दि.३ चांदूरबाजार :  चांदूरबाजार नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, नगराध्यक्ष पदाचा मानकरी कोण ठरणार, हे पाहण्यासाठी आता २१ डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
  • उत्स्फूर्त प्रतिसाद: ३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या मतदानाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी थंडीमुळे मंद गतीने सुरू झालेले मतदान, नंतर हळूहळू वाढत गेले, शहरातील अनेक केंद्रांवर तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.       
  • मतदानाची टक्केवारी:
  • मतदान प्रक्रिया विविध टप्प्यांत पार पडली आणि एकूण ६१.०७% मतदान झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली.
वेळटक्केवारी
पहिल्या दोन तासांत७.७०%
सकाळी ११:३० पर्यंत१९.९३%
दुपारी १:३० पर्यंत३२.६६%
दुपारी ३:३० पर्यंत४५.४१%
सायंकाळी ५:३० पर्यंत६१.०७% (पूर्ण)
 एकूण २१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती, ज्यात प्राथमिक उर्दू शाळा, नगरपरिषद माध्यमिक विद्यालय, जी.आर. काबरा विद्यालय आणि महाराष्ट्र शाळा यांचा समावेश होता.
सुरक्षा व्यवस्था: निवडणूक शांततेत व सुव्यवस्थित पार पडावी यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज होते. निवडणूक निर्णय अधिकारी सोनल सूर्यवंशी, सहाय्यक अधिकारी गीता ठाकरे, आणि ठाणेदार अशोक जाधव यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. अमरावती येथील अप्पर ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार यांनीही पाहणी केली.
किरकोळ वाद:  उर्दू स्कूल मतदान केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. खोली क्रमांक ४ मधील मतदान अधिकाऱ्यांनी मतदाराला विशिष्ट चिन्हाला मतदान करण्यास सुचवले, असा आरोप उपस्थित नागरिकांनी केला होता.यामुळे संताप व्यक्त करत नागरिकांनी मोठा गोंधळ घातला आणि परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.पोलिसांनी तातडीने घटनास्थळी हस्तक्षेप केला आणि तहसीलदारांना बोलावण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.आणि मतदान सुरळीत सुरू केले.
मतदारांची नाराजी:लोकसभा व विधानसभेत ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींचे घरी जाऊन मतदान केले गेले होते, मात्र नगरपरिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने त्यांना मतदान केंद्रावरच यावे लागले. यामुळे काही मतदान केंद्रांवर या मतदारांकडून प्रशासनाविषयी नाराजीचे सूर उमटल्याची चर्चा होती.
निकाल:उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये सील झाले असून, आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.या निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होणार होती, परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा आदेश दिला आहे.अमरावती जिल्ह्यातील ९ नगरपरिषद व २ नगरपंचायतीच्या मतदानाकरिता एकूण ३६६ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages