'अमृत दुर्गोत्सव २०२५'ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान! - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 12, 2025

'अमृत दुर्गोत्सव २०२५'ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान!









शिवछत्रपतींना दिली विश्वविक्रमी मानवंदना

अमरावती, दि. १३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेने आयोजित केलेल्या 'अमृत दुर्गोत्सव 2025' या उपक्रमाने ऐतिहासिक कामगिरी करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदविले आहे. शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी अमृतच्या पुणे मुख्यालयातील समारंभात  'मानवी हातांनी तयार केलेल्या प्रतिकृतींचा सर्वात मोठा डिजिटल फोटो अल्बम' या श्रेणीतील विश्वविक्रमाचे अधिकृत प्रमाणपत्र 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'चे प्रतिनिधी प्रवीण पटेल यांच्या हस्ते अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांना सुपूर्द करण्यात आले.

या उपक्रमाचा उद्देश महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम आणि संस्कृती रक्षण या गुणांना उजाळा देत समाजमन घडविणे आणि महाराजांना विश्वविक्रमी मानवंदना देणे हा होता. याअंतर्गत, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या बारा दुर्गांपैकी कोणत्याही एकाची प्रतिकृती अंगणात, सोसायटीत किंवा शाळेत तयार करून, त्यासोबतचा फोटो 'अमृत दुर्गोत्सव 2025' च्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

विजय जोशी यांच्या नियोजनामुळे आणि अमृत कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे हा शासकीय उपक्रम न राहता त्याला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले. महाराष्ट्रातूनच नव्हे, तर शेजारील राज्ये, अमेरिका, इंग्लंड आणि आखाती देशातूनही या उपक्रमाला उत्स्फूर्त व भावनिक प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे दुर्गांच्या प्रतिकृतींसोबत घेतलेल्या फोटोंची संख्या विक्रमी झाली.

प्रमाणपत्र प्रदान करताना, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे पंच प्रवीण पटेल यांनी या विश्वविक्रमाच्या कठीण तपासणी प्रक्रियेची माहिती दिली. योग्य चित्रे निवडणे, अस्पष्ट व दुबार चित्रे बाद करणे अशा अनेक दिवसांच्या क्लिष्ट तपासणीनंतर हा विश्वविक्रम प्रस्थापित होऊ शकला, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या यशाबद्दल विजय जोशी यांनी सर्व शासकीय अधिकारी, सामाजिक नेतृत्व, दुर्गप्रेमी, विद्यार्थी आणि सर्व शिवप्रेमी तसेच अमृत कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. सहभागी झालेल्या प्रत्येकास मा. मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे अभिनंदन पत्र मिळणार आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages