Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

पुलाच्या अर्धवट बांधकामातील बेफिकिरीचा बळी; टिप्परच्या धडकेत तरूणाचा जागीच मृत्यू



 प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच घटना घडल्याचा आरोप

 दि.२८ ब्राम्हणवाडा थडी  (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):-  ब्राम्हणवाडा थडी येथे चालू असलेल्या पुलाच्या अर्धवट व निष्काळजी बांधकामामुळे काल सकाळी झालेल्या अपघातात अमोल दादाराव पेटे (वय ४०) या तरुणाचा टिप्परच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून  दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

काल  सकाळी साधारण दहा वाजता अमोल पेटे हे आपल्या हिरो होंडा डिलक्स (MH-27 CT-4079) मोटरसायकलने महात्मा फुले बँक, चांदूरबाजार येथील डेली कलेक्शन करण्यासाठी जात होते. टी पॉइंटवर पुलाच्या कामाजवळ पोहोचताच ओव्हरलोड टिप्पर (MH-27 DT-1830) ने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की अमोल पेटे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अमोल पेटे हे वृद्ध आई-वडिलांचे एकुलते एक पुत्र होते. त्यांच्या कुटुंबाकडे शेतीवाडी नसल्याने घराची संपूर्ण जबाबदारी अमोल यांच्या खांद्यावर होती.

नागरिकांचा संताप आणि आंदोलन

    मागील चार महिन्यांपासून पुलाचे काम अत्यंत मंद गतीने सुरू आहे. पुलासाठी आणलेला मुरुम मागील तीन महिन्यांपासून रस्त्यावरच पडून असल्याने वाहतुकीसाठी पूर्ण मार्ग अरुंद झाला होता.या ठिकाणी सूचना फलकांचा पूर्ण अभाव, तसेच डायव्हर्शनची कोणतीही व्यवस्था नाही, असा गंभीर निष्काळजीपणा प्रशासनाकडून होत असल्याचे समोर आले आहे.

    या घटनेमुळे संतापलेल्या स्थानिक नागरिकांनी आणि गावकऱ्यांनी अपघातस्थळी गर्दी केली. त्यांनी मृतदेह रस्त्यावरून हटवू दिला नाही आणि रस्ता अडवून धरला. टिप्पर चालकावर कठोर कारवाई करावी आणि परिसरात टिप्परच्या वाहतुकीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी आंदोलक करत होते.

     अकस्मात मृत्यूमुळे संतप्त नागरिकांनी ब्राम्हणवाडा थडी-चांदूरबाजार मार्ग दोन तास बंद करून रस्ता रोको आंदोलन केले. प्रशासनावरील निष्काळजीपणाचा जोरदार निषेध करण्यात आला.

    घटना घडल्यानंतर नायब तहसीलदार मनोज सोनारकर दुपारी साडेबाराच्या सुमारास ब्राह्मणवाडा थडी पोलीस ठाण्यात आले. ब्राह्मणवाडा थडी येथे कायमस्वरूपी तलाठी नसल्याने परिसरात गौण खनिज तस्करीही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची नागरिकांची तक्रार आहे.  

    पोलीस कारवाई: ठाणेदार प्रशांत जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. टिप्पर चालकाला ताब्यात घेतले असून ओव्हरलोड टिप्पर पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आला आहे. मृतदेहाचे पंचनामा करून शव विच्छेदनासाठी चांदूरबाजार उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

    महसूल विभाग केवळ नाममात्र कारवाई करून तस्करांना मोकळे सोडतात, असा नागरिकांचा आरोप आहे. 

    या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

     









    Post a Comment

    0 Comments