जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रकल्पग्रस्तांचा सकारात्मक प्रतिसाद - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, October 17, 2025

जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रकल्पग्रस्तांचा सकारात्मक प्रतिसाद




स्थलांतरणाला पूर्ण सहकार्य करण्याचे सरपंचांचे आश्वासन

अमरावती, दि. १७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): निम्न पेढी प्रकल्पामध्ये बाधीत झालेल्या गावांचे दर्जेदार पुनर्वसन करण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन त्या मान्य केल्या आहेत. निम्न पेढी प्रकल्पाच्या घळभरणीला शासनाने मान्यता दिल्याने या कामास सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे बाधित गावातील नागरिकांनी पुनर्वसित गावात तातडीने स्थलांतरीत व्हावे, या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या आवाहनाला बाधीत गावाच्या सरपंचांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात काल निम्नपेढी प्रकल्पाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रद्धा उदावंत, प्रसेनजित चव्हाण यांच्यासह बाधीत गावातील प्रतिनिधी निलेश मानकर, गौतम खंडारे, प्रविण तायडे उपस्थित होते. उपस्थितांना निम्न पेढी प्रकल्पातील पुनर्वसनाबाबत शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात आली. तसेच लोकप्रतिनिधींच्या शंकांचे समाधान करण्यात आले.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी पुनर्वसित गावात रस्ते, दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे. तसेच 150 घरकुल मंजूर करण्यात आली आहेत. तसेच स्थलांतरणासाठी देण्यात येणारा दोन लाख रूपयांचा भत्ता एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले. तसेच पुनर्वसित गावांमधील सोयीसुविधांसाठी 57 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून गावाच्या मागणीप्रमाणे इतर योजनांमधून सुविधा उभारण्यात येतील. प्रकल्पामुळे 12 हजार हेक्टर क्षेत्रात सिंचनाची सुविधा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्ते करून दिले जाणार आहे, असे सांगितले.

शासनाने निम्न पेढी प्रकल्पाच्या घळभरणीची परवानगी दि. 14 ऑक्टोबर रोजी दिली आहे. त्यामुळे तातडीने हे काम हाती घेण्यात आले आहे. घळभरणीचे काम फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत प्रकल्पात पाणी साठण्यास सुरवात होणार असल्याने हा पाणीसाठा बाधीत गावात येणार आहे. त्यामुळे अद्यापही स्थलांतरीत झाले नसलेल्या नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांचे स्थलांतर करावे, अशा सुचना देण्यात आल्या. बाधित गावातील नागरिकांना प्राधान्याने घरकुल मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकाची निवाऱ्याशिवाय गैरसोय होणार नाही. निम्न पेढी प्रकल्प प्रधानमंत्र्यांच्या प्राधान्याचा प्रकल्प असल्याने यास गती देण्यात आली आहे. सरपंचांनी सकारात्मक पावले उचलून नागरिकांचे पुनर्वसित गावात स्थलांतरीत करावे, असे आवाहन केले.

निम्न पेढी प्रकल्पातील सर्व गावांचे पुनर्वसन होण्यासाठी पारदर्शकता राखण्यात आली. विशेष पॅकेज देण्यात आल्याने प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींशी सातत्याने संवाद राखला. त्यांच्या प्रयत्नातील सातत्याने प्रकल्पबाधीत पुनर्वसित गावात जाण्यास तयार झाले आहेत. प्रकल्पबाधितांच्या मागण्या आणि देण्यात येणाऱ्या सुविधांमुळे हा प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

…..

प्रकल्पग्रस्तांची घरकुल आणि दर्जेदार पुनर्वसनाची मागणी मान्‍य करण्यात आली आहे. पुनर्वसनाच्या कामात पारदर्शकता, तसेच खारपाणपट्टा असल्याने शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली आहे. महत्वाचे प्रश्न मार्गी लागल्याने पुनर्वसनाला वेग आला आहे. स्मशानभूमी स्थलांतर आणि ओपन जिमची मागणी मान्य झाली आहे. तसेच इतरही प्रश्न येत्या काळात मार्गी लागतील. त्यामुळे नागरिकांच्या स्थलांतरणासाठी प्रयत्न करण्यात येतील.

निलेश मानकर, कुंड सर्जापूर

…..

गेल्या कालावधीत दर्जेदार पुनर्वसनाची कामे गतीने झाली आहेत. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले आहे. घराच्या बांधकामासाठी मदत मिळणार आहे. तसेच स्थलांतरणासाठी दोन लाख रूपयांची रक्कम एकत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचे पुनर्वसित गावात स्थलांतरण होणार आहे. पुनर्वसनाबाबत शासनाने मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे स्थलांतरणासाठी सहकार्य करण्यात येईल.

गौतम खंडारे, अळणगाव

..…

प्रकल्पबाधीत गावांतील नागरिकांना भूखंडांचा लाभ देण्यात येत आहे. तसेच कुंड खुर्द, सावरखेड, ततारपूर येथील रस्त्यांचा विषय मार्गी निघाला आहे. पुनर्वसित गावात विकासकामांचा निधी मंजूर झाला आहे. नवीन स्मशानभूमी आणि ओपन जीमची मंजूरात मिळाली आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसांत संपूर्ण गावाच्या स्थलांतरण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

सुजाता तायडे, कुंड सर्जापूर


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages