भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत भूजल दिन साजरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, July 22, 2025

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत भूजल दिन साजरा

 



अमरावती, दि. २२  (ग्रामीण उदय प्रतिनिधी): भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, अमरावती येथे नुकताच , ‘५४  वा वर्धापन दिन- भूजल दिन’ साजरा करण्यात आला. प्रादेशिक उपसंचालक डॉ. चंद्रकांत भोयर आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक राजेश सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना डॉ. चंद्रकांत भोयर यांनी महाराष्ट्राच्या जलसुरक्षेमध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचीभूमिका अधोरेखित केली. भूजल पातळीचे सर्वेक्षण करून पाण्याचा शाश्वत वापर सुनिश्चित करणे आणि जलसंधारणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे, ही भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. अनेक गावांना आणि शेतकऱ्यांना पाण्याच्या उपलब्धतेबाबत मार्गदर्शन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी समाजाने एकत्र येऊन काम करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

वरिष्ठ भूवैज्ञानिक राजेश सावळे यांनी भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. वर्धापन दिनानिमित्त सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून मिळालेल्या ५० वृक्षांची (कडुनिंब, आवळा, पेरू, बकुळ, बेल, शमी) कर्मशाळेच्या परिसरात लागवड करण्यात आली. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने एक झाड दत्तक घेऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ प्रमोद झगेकर यांनी तर आभार प्रदर्शन वरिष्ठ लिपिक सचिन ठाकरे यांनी केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages