ग्राहकांनी हक्क अधिकाराबाबत सजग राहण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, September 24, 2026

ग्राहकांनी हक्क अधिकाराबाबत सजग राहण्याचे आवाहन


·         गणेशोत्सव मंडळांमध्ये माहिती व जनसंपर्क विभागाच्या ‘लोकसंवाद’ अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विभागाच्या अधिकाऱ्यांद्वारा शासकीय योजनांची नागरिकांना थेट माहिती


·         अंधेरीमध्ये वजन मापे तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या ई-केवायसी, आयुष्यमान भारत योजनेसह विविध योजनांबाबत मार्गदर्शन


            मुंबई, दि. २४ : शासकीय योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने राज्यभर ‘लोकसंवाद’ अभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईतील गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून नागरिकांना शासन योजनांची माहिती थेट  देण्यात येत आहे. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सोमवारी अंधेरी परिसरातील विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये वजन मापे कार्यालय,आरोग्य विभाग तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली.


यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाच शिधावाटप अधिकारी अश्विन रोहिणीकर, सहाय्यक शिधावाटप अधिकारी विजयकुमार वाघ, आशुतोष राणे, शिधावाटप निरिक्षक श्रीकृष्ण डाहे,नितीन नखाते, सुंदर गजभारे यांच्यासह वजन मापे कार्यालय अंधेरी अधिकारी नायकवाड, सांताक्रुझ वजन मापे कार्यालयाचे अधिकारी गणेश गायकवाड, या अधिकाऱ्यांनी नागरिकांना विविध शासकीय योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

सुरुवातीला माहिती व जनसंपर्क विभागाच्या वरिष्ठ सहायक संचालक वंदना थोरात यांनी ‘लोकसंवाद’ उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करून अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती दिली. माहिती व जनसंपर्क विभागाच्या वरिष्ठ सहायक संचालक मनिषा सावळे यांनी यावेळी आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली. यावेळी चकाला परिसरातील आंबेडकर नगरचा राजा गणेशोत्सव मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय हिंगवाले, गौतमनगर अंधेरी पूर्व भागातील संघर्ष तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल लष्करे ,उपाध्यक्ष तन्मय कांबळे,विजय आव्हाड, जय वाल्मिकी मित्रमंडळ मरोळ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सागर पिवाल,ओम नवयुग मित्र ममंडळाचे सदा शेट्टी,विशाल चौघुले, आंबडेकर नगर रहिवासी संघ मरोळ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रेम पुजारी तसेच उपाध्यक्ष महादेव पुजारी,यांच्यासह गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि भाविक उपस्थित होते.

                                    ग्राहकांनी आपल्या तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक वापरावा

दैनंदिन व्यवहारांमध्ये नागरिकांनी ग्राहक म्हणून आपल्या हक्क अधिकारांबाबत दक्ष राहण्याची गरज असून विविध खरेदी व्यवहारांमध्ये नागरिकांनी वस्तूंवरील एक्सपायरी डेट पाहून छापील किंमतीला वस्तू घेण्यासाठी आग्रही असले पाहिजे. पेट्रोल पंपावर मापाप्रमाणे पेट्रोल डिजेल मिळत आहे का याची खातरजमा ग्राहक त्या ठिकाणी असलेल्या अधिकृत मापातून मोजणी द्वारे करु शकता. जर दुकानदार अधिक पैसे लावत असेल तर त्याबाबत वजन मापे कार्यालयात तक्रार नोंदवता येईल तसचे १९१५ किंवा १८००११४००० या टोल फ्री क्रमांकावर नागरिक आपली तक्रार नोंदवू शकता. तसेच व्हाटसॲप क्रमांक ८८००००१९१५ यावर देखील तक्रार करता येते.यासह वजनमापे कार्यालयामार्फत ग्राहकांची खेरदी व्यवहारात होणारी फसवूणक रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत नायकवाड तसेच गणेश गायकवाड यांनी सविस्तर माहिती दिली.

 

 

ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ तसेच शिधावाटप विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली. शिधापत्रिकाधारकांसाठी उपलब्ध असलेल्या योजना, नवीन शिधापत्रिकेसाठी आवश्यक कागदपत्रे, ई-केवायसीचे महत्व तसेच ऑनलाइन सुविधांची माहिती देण्यात आली. शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांनी ई-पॉस मशिनद्वारे ई-केवायसी करून घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ज्या सदस्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी तातडीने अधिकृत शिधावाटप दुकानात जाऊन ती पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

शिधापत्रिकेतील सदस्यांचे मोबाइल सिंडिंग करण्याचे काम सुरू असून, ऑनलाइन रेशन कार्ड सुविधाही उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली. शिधावाटपाशी संबंधित तक्रारींसाठी शिधापत्रिकेवर टोल फ्री क्रमांक नमूद करण्यात आला असल्याचेही सांगण्यात आले.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती पाच किलो धान्याचा लाभ दिला जातो. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रति शिधापत्रिका ३५ किलो धान्य वितरित केले जाते. तसेच ‘वन नेशन वन रेशन’ सुविधेमुळे पात्र लाभार्थ्यांना पोर्टेबिलिटीच्या माध्यमातून कोणत्याही अधिकृत शिधावाटप दुकानातून शिधाजिन्नस घेता येतात, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

नवीन शिधापत्रिकेसाठी कागदपत्रांची माहिती

नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी पूर्वीच्या शिधापत्रिकेतून नाव कमी केल्याचा दाखला तसेच रहिवासी पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती नागरिकांना देण्यात आली. भाडेपावती, एलपीजी जोडणी, बँक पासबुक, वीज देयक, वाहनचालक परवाना, आधार कार्ड आदींपैकी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. प्रत्यक्ष जागेची पडताळणी केल्यानंतरच नवीन शिधापत्रिका देण्यात येते, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ऑनलाइन सुविधांचेही मार्गदर्शन

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत, ऑनलाइन सुविधांचा वापर, तांत्रिक अडचणींचे निराकरण तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या विविध डिजिटल सेवांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी शिधापत्रिका आणि ऑनलाइन सेवांशी संबंधित त्यांच्या अडचणी मांडल्या. विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे निराकरण करून आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन केले.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वैद्यकीय उपचारांसाठी पाच लाखापर्यंत आर्थिक सहाय्य विनामुल्य मिळते यासोबत विभागामार्फत उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती देत ‘आयुष्मान ॲप’च्या माध्यमातून आयुष्मान कार्ड काढून ठेवावे, असे आवाहनही करण्यात आले. नागरिकांनी उपस्थित केलेल्या तक्रारींवर संबंधित अधिकाऱ्यांनी समाधानकारक निराकरण करत मार्गदर्शन केल्याने उपस्थितांनी लोकसंवाद उपक्रमाबाबत आनंद व्यक्त केला.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages