अमरावती, दि. १७: महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली राज्य कामगार विमा योजना आयुक्तालयाच्या आदेशानुसार वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय अमरावती अंतर्गत सर्व सेवा दवाखान्यामार्फत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबविले जाणार आहे. या अंतर्गत विमाधारक व त्यांच्या कुटुंबीयांना या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी उपचार, जनजागृती तसेच विविध आजाराविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. यात प्रामुख्याने वृक्षारोपण, रक्तदान व अवयवदान जागरुकता शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, योग व ध्यान शिबिर, स्वच्छता शिबिर, व्यसनमुक्त भारत जनजागृती शिबिर, महिलांचे आरोग्य व स्वच्छता, पोषण व ॲनिमिया जनजागृती शिबिर, बालरोग शिबिर अशा विविध उपक्रमांचा समावेश या सेवा संकल्प अभियानामध्ये आहे. वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. प्रिती काटे, प्रशासन अधिकारी डॉ.राजनारायण गोमासे, सर्व सेवा दवाखान्यातील प्रभारी विमा वैद्यकीय अधिकारी, तसेच वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालयातील श्रीमती स्नेहा बारसागडे (अधिपरिचारीका), श्री. योगेश कोल्हे (वरिष्ठ लिपिक) व इतर कर्मचारी या संपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन पार पाडणार आहेत. सदर सेवा संकल्प अभियानाचा लाभ सर्व विमाकामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, अमरावती तर्फे करण्यात आले आहे.