पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, September 15, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणीकरणासाठी ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी जाहीर

 

·       शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरण करण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे आवाहन

 

मुंबई, दि. १५ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठीची दुसरी यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत एकूण ३ लाख ५५ हजार ६१४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांनी यादीतील आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.

 

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, ही यादी जिल्हानिहाय आणि बँकनिहाय  प्रसिद्ध करण्यात आली असून, ती संबंधित बँक शाखा, विकास संस्था तसेच ग्रामपंचायतींमध्येही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

 पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या १२ लाख ५८ हजार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर १० हजार ११४ कोटी ९० लाख रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. यामध्ये ७ ऑगस्ट २०२६ रोजी ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २८ कोटी ६० लाख रुपये, तर २४ ऑगस्ट २०२६ रोजी ६ लाख ३६ हजार शेतकऱ्यांना ५ हजार ८६ कोटी ३० लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.

 

दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकीची रक्कम तपासून नजीकच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे तसेच पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून, त्यासाठी महाआयटीची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेच्या पोर्टलवर बँकांनी एकूण ३१ लाख १७ हजार थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे. महाआयटीने संगणकीय प्रक्रियेद्वारे निश्चित केलेल्या १६ लाख ९६ हजार पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केली होती.

 

राष्ट्रीयीकृत आणि व्यापारी बँकांमधील काही शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या ‘हेअर कट’ धोरणानुसार संबंधित कर्जे निरंक करण्यात येणार आहेत.

 

योजनेतील पात्र मृत शेतकरी, वयोवृद्ध तसेच बोटांचे ठसे नोंद होत नसलेल्या लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी १९ ऑगस्ट २०२६ रोजी मानक कार्यप्रणाली (एसओपी) निर्गमित करण्यात आली आहे.

 

विभागनिहाय पात्र लाभार्थी

दुसऱ्या यादीतील विभागनिहाय लाभार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे :

छत्रपती संभाजीनगर विभाग – १ लाख ९५ हजार ८९९

अमरावती विभाग – ७१ हजार ७९६

नागपूर विभाग – ३४ हजार ५२०

नाशिक विभाग – २५ हजार ४७१

पुणे विभाग – २३ हजार ११७

कोकण विभाग – ४ हजार ८११

पात्र शेतकऱ्यांनी संबंधित यादीत आपले नाव तपासून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करावी, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages