भंडारा, दि. २४ :-
भंडारा येथे एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने ३ किलो वजनाच्या बाळाला जन्म दिल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २२ सप्टेंबर रोजी घडली आहे.
मूळचे छत्तीसगड येथील एक कुटुंब महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली येथे मजुरीसाठी वास्तव्यास आले होते. या कुटुंबात मृत अल्पवयीन मुलगी तिचे आई-वडील, भाऊ आणि छत्तीसगडमधूनच आलेला कार्तिक अर्जुन कुरवे (वय २१ वर्ष) हा तरुण एकत्र राहत होते.
शेजारी राहणाऱ्या २१ वर्षीय कार्तिक कुरवे आणि या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची ओळख झाली, ज्याचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधात झाले. या प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली.
सोमवार, २१ सप्टेंबर रोजी मुलीला प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर तिला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी तिने एका सुदृढ, ३ किलो वजनाच्या नवजात बाळाला जन्म दिला. मात्र, प्रसूतीनंतर तिची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.
मुलीची प्रसूती सामान्य (Normal Delivery) झाली की शस्त्रक्रियेद्वारे (Cesarion), किंवा उपचारादरम्यान नेमकी काय वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाली, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सुजाता दुधगावकर यांनी या प्रकरणाबद्दल कोणतीही माहिती देण्यास नकार दिला असून, शवविच्छेदन (Post-mortem) अहवाल आणि वैद्यकीय नोंदी समोर आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे सांगितले आहे.
या संपूर्ण प्रकरणात पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने अरोली पोलिसांनी २१ वर्षीय तरुण कार्तिक अर्जुन कुरवे याला अटक केली आहे.