अमरावती, दि. ४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : येथील रुक्मिणीनगरात स्थित शासकीय वरिष्ठ मुलांच्या बालगृहात प्रवेशित असलेल्या सारंग सलीम या बालकाच्या घरचा पत्ता व कुटुंबीयांची ओळख पटविण्यासाठी चाइल्ड हेल्पलाइन अमरावतीमार्फत शोधमोहीम सुरू आहे. या बालकास किंवा त्याच्या आई-वडील, भाऊ-बहिणी व कुटुंबीयांना ओळखणाऱ्या व्यक्तींनी चाईल्ड हेल्पलाईन 1098 व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमरावती (संपर्क क्रमांक 9021358816) तसेच चाईल्ड हेल्प लाईन समन्वयक (संपर्क क्रमांक 9922604308) या संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट यांनी केले आहे. बालकाच्या कुटुंबीयांचा शोध लागल्यास त्याची ओळख पटवून पुढील कायदेशीर व पुनर्वसनात्मक कार्यवाही करण्यास मदत होणार आहे.
बालकाने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या आईचे नाव नीतू, भाऊ निलेश व नीलू आणि बहिणी शितल व खुशी अशी नावे आहेत. बालकाने पूर्वीचा पत्ता मनपा शाळा क्रमांक 2, मसानगंज, अमरावती असा सांगितला आहे. त्याची आई अमरावती येथे 'संगीता' नावाच्या महिलेच्या भाजीच्या दुकानातून भाजी घेत असल्याचेही बालकाने सांगितले आहे.
बालकाचा शोध यापूर्वीही संबंधित यंत्रणांकडून घेण्यात आला होता. तसेच जुलै 2026 मध्ये बालकास अमरावती येथे आणून त्याने सांगितलेल्या परिसरात प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली मात्र कुटुंबीयांचा ठोस पत्ता मिळू शकला नाही.