ब्राह्मणवाडा थडीत तृतीयपंथीयांवर गुन्हे
महिला व मुलांना लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव केल्याचा आरोप
चांदूर बाजार : तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान अश्लील नृत्य व आक्षेपार्ह हावभाव केल्याच्या आरोपावरून पाच तृतीयपंथीयांसह गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे मिरवणुकीत उपस्थित महिला व मुलांना लज्जा उत्पन्न होईल, असे हावभाव करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे.
ब्राह्मणवाडा थडी येथील माळीपुरा परिसरातील दत्त गणेश मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत नागपूर येथून पाच तृतीयपंथीयांना नृत्य सादरीकरणासाठी बोलावण्यात आले होते. मिरवणुकीदरम्यान संबंधितांनी अश्लील नृत्य केल्याचे तसेच महिला व मुलांना लज्जा उत्पन्न होईल, असे हावभाव केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित तृतीयपंथीयांसह गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध कारवाई केली. प्रकरणी मंडळाचे अध्यक्ष आकाश गजानन लोंढे, तसेच अजय मनोहर खडसे, आदित्य सुभाष इंगळे, प्रज्वल मनोज बोडखे आणि अर्जुन अशोक मांडवकर यांच्यासह तृतीयपंथीयांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार स्वरा शिंदे, श्रावणी माहेरखळ, ऐशा चव्हाण, राजू गोडाम आणि भूमी इरुळे यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ब्राह्मणवाडा थडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक, महिला आणि लहान मुले सहभागी होत असतात. त्यामुळे सार्वजनिक मिरवणुकीदरम्यान अश्लील अथवा आक्षेपार्ह नृत्य-हावभाव टाळण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपांची पुढील तपासणी पोलिसांकडून केली जात आहे.
पोलिसांचा सार्वजनिक कार्यक्रमांसाठी इशारा
गणेशोत्सव, धार्मिक मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होतात. त्यामुळे अशा कार्यक्रमांमध्ये सार्वजनिक शिस्त आणि सभ्यतेचे पालन करणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य किंवा आक्षेपार्ह वर्तन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.