अमरावती, दि. १२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : आगामी काळातील सण-उत्सव आणि विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीण पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कडक पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 38 अन्वये अमरावती ग्रामीण पोलीस क्षेत्रात विनापरवाना ढोल-ताशे, बँड, ध्वनिक्षेपक आणि आवाज निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी जारी केले आहेत.
संबंधित पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी जागेत गायन, वाद्य संगीत, ढोल-ताशे, ध्वनिक्षेपक, तसेच मोठा आवाज किंवा प्रतिध्वनी निर्माण करणारी यंत्रे वाजवण्यास मनाई आहे.
मोठ्या आवाजामुळे नागरिकांना होणारा त्रास, अस्वस्थता आणि शांतता भंग टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आवाजाचे नियमन व नियंत्रण करण्याचे पूर्ण अधिकार संबंधित पोलीस अंमलदारांना देण्यात आले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 136 अन्वये कायदेशीर कारवाई केली जाईल.
हा आदेश 31 डिसेंबर 2026 च्या रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण अमरावती ग्रामीण क्षेत्रात लागू राहणार आहे. गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दिवाळी, गुरुनानक जयंती व नाताळ या सणांच्या काळात सामाजिक शांतता व कायदा सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी नागरिकांनी आणि आयोजकांनी या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.