स्व. सुधाकरराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, August 22, 2026

स्व. सुधाकरराव नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

   दिनांक: २२ ऑगस्ट २०२६

 



          अमरावती, दि. २२: जलक्रांतीचे जनक तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारण व कृषी विकास क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचे स्मरण करण्यात आले.

          स्व. सुधाकरराव नाईक यांनी राज्यात जलसंधारणाच्या कामांना व्यापक चालना देत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला विशेष महत्त्व दिले. जलसंधारणाच्या कामांना संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी स्वतंत्र जलसंधारण विभागाच्या स्थापनेला त्यांनी पुढाकार दिला. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन शासनाने त्यांच्या जन्मदिनी, २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

          यावेळी अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) संजय जाधव, अपर आयुक्त (विकास/आस्थापना) संतोष कवडे, सहाय्यक आयुक्त (मागासवर्ग कक्ष) वैशाली पाथरे, तहसीलदार अनिता झाडे, सागर ढोमसे, नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख, संजय मुरतकर तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

          कार्यक्रमादरम्यान जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पावसाचे पाणी अडविणे, पाण्याची बचत व योग्य वापर करणे, भूजलपातळी वाढविणे तसेच उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जलसंधारणविषयक कार्यातून प्रेरणा घेऊन जलसंधारणाच्या कामांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

 



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages