Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मान्सूनपूर्व पूर आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज


मालखेड तलावावर रंगीत तालीम संपन्न

अमरावती, दि.१२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उद्भवू शकणाऱ्या पूर परिस्थितीचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी अमरावती जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आशिष येरेकर यांच्या आदेशाने  मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ ) नागपूर आणि जिल्हा शोध व बचाव पथक, जिल्हाधिकारी कार्यालय , अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या थरारक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.


 

            निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड तलाव येथे जिल्हास्तरीय पूर आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम (मॉकड्रिल) पार पडली.  या रंगीत तालीमीदरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुरक्षित सुटका करणे, त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवणे आणि पूर परिस्थितीमुळे घरांची पडझड किंवा इतर आपत्ती ओढवल्यास शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून जीवितहानी कशी टाळायची, याचे थेट सादरीकरण करण्यात आले. विशेषतः ग्रामीण भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास ती स्थानिक पातळीवर कशी हाताळावी, याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण एनडीआरएफ नागपूर आणि जिल्हा शोध व बचाव पथकातील तज्ज्ञांनी विविध प्रात्यक्षिकांद्वारे दिले. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काय असाव्यात, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेत चांदूर रेल्वे तालुक्यातील महसूल विभाग, गटविकास अधिकारी, संबंधित कर्मचारी आणि आरोग्य यंत्रणेने सक्रिय सहभाग घेतला.


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, चांदूर रेल्वेचे नायब तहसीलदार अनिल चौरे, पोलीस निरीक्षक श्री. मिश्रा, पोलीस निरीक्षक श्री. यादव, एनडीआरएफ नागपूरचे डॉ. झा, मुंबई मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ अनुराग कचोरी, महसूल अधिकारी प्रमोद शिरसाठ, तलाठी दीपक चव्हाण, आरोग्य यंत्रणेचे डॉ. अविनाश पवार, प्रीती पवार, सौरव पाठक, मनोज माकोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी सचिन धरमकर, विशाल लिमकर, आकाश निमकर, कौस्तुभ वैद्य, सुमित बांबल, प्रतिक कडू, नारायण दवंगे, अशोक निंबरते तसेच 'आपला मित्र' संस्थेचे तुषार गोंडाणे व अमोल गोंडाणे यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून शौर्यपूर्ण बचावकार्याची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी केले.


Post a Comment

0 Comments