सासरच्यांनी जावयासाठी धोंड्यात लपवून ठेवलेली सोन्याची अंगठी मांजराने गिळली; उपचारादरम्यान मांजराचा मृत्यू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, June 12, 2026

सासरच्यांनी जावयासाठी धोंड्यात लपवून ठेवलेली सोन्याची अंगठी मांजराने गिळली; उपचारादरम्यान मांजराचा मृत्यू




दि. ११ माजलगाव (जि. बीड):
अधिक मासानिमित्त (धोंड्याच्या महिन्यात) जावयाला सोन्याची अंगठी भेट देण्याचा सासरच्यांचा बेत एका मांजरामुळे पुरता फसला. अंगठी लपवून ठेवलेला 'धोंडा' (एक प्रकारचा गोड अन्नपदार्थ) घरात आलेल्या मांजराने खाल्ल्यामुळे जावयाला सोन्याऐवजी कपड्यांचा आहेर करूनच बोळवण करावी लागली. माजलगाव जवळील एका वस्तीवर ४ जून रोजी ही विचित्र घटना घडली.
सासूबाईंनी आपल्या जावयाला सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी एका धोंड्यात (खाद्यपदार्थात) लपवून ठेवली होती. तो अंगठी असलेला धोंडा त्यांनी इतर धोंड्यांसोबतच एकत्र ठेवला. मात्र, स्वयंपाक झाल्यानंतर घरातील आवराआवरी सुरू असताना, घरात आलेल्या एका मांजराने नेमका तोच अंगठी असलेला धोंडा फस्त केला. धोंडा गायब झाल्याचे आणि मांजराने तो खाल्ल्याचे लक्षात येताच घरातील सर्वांची एकच धांदल उडाली.
सोन्याची अंगठी परत मिळावी यासाठी कुटुंबाने मांजरीला सलग चार दिवस घरात बांधून ठेवले. विष्ठेच्या वाटे अंगठी बाहेर पडेल, अशी सासरच्यांना अपेक्षा होती. मात्र, चार दिवस उलटूनही अंगठी बाहेर न आल्याने अखेर तिला पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे नेण्यात आले.
मांजरीच्या पोटातून धोंडा आणि अंगठी बाहेर पडावी यासाठी डॉक्टरांनी तिला उलटी होण्याचे औषध दिले. परंतु, मांजरीला उलटी झाली नाही, उलट औषधाच्या त्रासामुळे त्या निष्पाप मांजरीचा जीव गेला.
मांजराचा मृत्यू झाल्यानंतर, सोन्याची अंगठी काढण्यासाठी मृत मांजरीच्या पोटावर शस्त्रक्रिया (ऑपरेशन) करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर अखेर ती ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी मांजराच्या पोटातून बाहेर काढण्यात आली. एका सरप्राईजच्या नादात सासरच्यांना सोन्याची अंगठी तर मिळाली, पण एका मुक्या प्राण्याला आपला जीव गमवावा लागला.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages