हिंदू पंचांगात दर तीन वर्षांनी येणारा 'अधिकमास' हा केवळ धार्मिक विधींचा काळ नसून, तो खगोलशास्त्रावर आधारित एक अत्यंत अचूक अशी कालगणना आहे. यालाच 'मलमास', 'धोंड्याचा महिना' किंवा 'पुरुषोत्तम मास' असेही म्हटले जाते.
हे 'अतिथी' महिन्यामागचे शास्त्र काय?
पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी साधारण ३६५ दिवस लागतात (सौर वर्ष), तर चंद्राच्या १२ फेऱ्या ३५४ दिवसांत पूर्ण होतात. या दोन्ही वर्षांत दरवर्षी सुमारे ११ दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी आणि निसर्गातील ऋतूंचे चक्र पंचांगाशी जुळवून ठेवण्यासाठी दर ३२ महिने १६ दिवसांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, तोच म्हणजे अधिकमास.
'धोंडा' आणि 'पुरुषोत्तम' नावाची रंजक कथा
धोंड्याचा महिना: पूर्वी या महिन्यात सूर्याचे संक्रमण (एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे) होत नसल्याने याला 'मलिन' किंवा 'अशुभ' मानले जायचे. या काळात शुभ कार्ये वर्ज्य असल्याने लोकांनी याला 'दगडासारखा' किंवा 'धोंड्याचा' महिना म्हणायला सुरुवात केली.
पुरुषोत्तम मास: पौराणिक कथेनुसार, जेव्हा सर्व देवांनी या महिन्याचे स्वामी होण्यास नकार दिला, तेव्हा भगवान विष्णूंनी स्वतःचे नाव देऊन याचा स्वीकार केला. विष्णूंच्या 'पुरुषोत्तम' या नावामुळे याला अनन्यसाधारण आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले.
२०२६ चा विशेष योग: 'अधिक ज्येष्ठ'
येत्या १७ मे २०२६ ते १५ जून २०२६ या काळात 'अधिक ज्येष्ठ मास' येणार आहे. तब्बल ११ वर्षांनंतर असा विशेष योग जुळत असून, हे वर्ष १२ ऐवजी १३ महिन्यांचे असेल.
परंपरा आणि महत्त्व
३३ या आकड्याचे महत्त्व: अधिक महिना साधारण ३३ दिवसांचा असतो, म्हणून या महिन्यात ३३ अनारसे किंवा वस्तूंचे वाण देण्याची पद्धत आहे तसेच ३३ कोटी देवांचे प्रतीक म्हणून ३३ वातींचा दिवा (वेणीमाधव वात) लावला जातो, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते
जावयाचे पूजन: हिंदू संस्कृतीत जावयाला लक्ष्मी-नारायणाचे रूप मानले जाते. म्हणून या महिन्यात जावयाला घरी जेवायला बोलावून 'वाण' देण्याची प्रथा आहे.या काळात जावयाला ३३ अनारसे वाण म्हणून देण्याची पद्धत आहे. आजही तितक्याच उत्साहात पाळली जाते.
दहापट पुण्य: पौराणिक मान्यतेनुसार, अधिकमासात केलेले नामस्मरण, उपासना आणि दानधर्म यांचे पुण्य नियमित काळापेक्षा १० पट अधिक मिळते.
पुनश्च हरि ओम: ज्याप्रमाणे परीक्षेच्या शेवटी शिक्षक १० मिनिटे वाढवून देतात, तसाच हा महिना अध्यात्मिक प्रगतीसाठी ईश्वराने दिलेला 'बोनस महिना' मानला जातो
काय करावे आणि काय टाळावे?
काय करावे: दीपदान, उपवास, नामस्मरण, आणि अन्नदान या गोष्टींना प्राधान्य दिले जाते.
काय टाळावे: विवाह, मुंज, गृहप्रवेश, बारसे किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात यांसारखी काम्य किंवा मंगल कार्ये या महिन्यात वर्ज्य असतात
आध्यात्मिक साधना: या काळात जप, तप, दानधर्म आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करणे अत्यंत फलदायी मानले जाते.
अधिकमास म्हणजे विज्ञानाने दिलेली वेळेची 'सुधारणा' आणि अध्यात्माने दिलेली भक्तीची 'संधी' आहे.