अचलपूर-परतवाड्यात भीषण आग; अग्निशमन दलाच्या विलंबाने लाकूड बाजार भस्मसात, व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, May 4, 2026

अचलपूर-परतवाड्यात भीषण आग; अग्निशमन दलाच्या विलंबाने लाकूड बाजार भस्मसात, व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान

 


दि. ५ परतवाडा:
अचलपूर-परतवाडा जुळ्या शहरातील गजबजलेल्या लकडबाजार परिसरात फर्निचरच्या दुकानांना लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेमुळे अनेक व्यापाऱ्यांचे संसार उघड्यावर आले असून, प्रशासकीय दिरंगाईबद्दल परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 
काल पहाटेच्या सुमारास लकडबाजार भागातील एका फर्निचरच्या दुकानाला अचानक आग लागली. लाकूड आणि ज्वलनशील पदार्थांमुळे आगीने अल्पावधीतच रौद्र रूप धारण केले आणि शेजारील इतर दुकानांनाही आपल्या विळख्यात घेतले. आकाशात धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत होत्या. स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीची भीषणता अधिक होती.
प्रशासकीय निष्काळजीपणावर संताप
या घटनेत सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे, माहिती देऊनही अग्निशमन दलाची गाडी वेळेवर घटनास्थळी पोहोचू शकली नाही. अग्निशमन दलाच्या या अक्षम्य विलंबा मुळे आग अधिक पसरली आणि जे नुकसान टाळता आले असते, ते भीषण स्वरूपात समोर आले. या ढिसाळ नियोजनामुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष पाहायला मिळत आहे. 
नुकसानग्रस्तांची भेट आणि धीर
घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी मा. श्री. प्रवीण भाऊ तायडे यांनी  तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. जळालेल्या दुकानांचे विदारक दृश्य पाहून त्यांनी उपस्थित व्यापाऱ्यांशी संवाद साधला व त्यांना आधार दिला. "अनेक वर्षांची मेहनत या आगीत राख झाली आहे, पण आम्ही तुम्हाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी खंबीरपणे पाठीशी आहोत," अशा शब्दांत त्यांनी व्यापाऱ्यांचे सांत्वन केले. 
अधिकाऱ्यांकडे विचारला जाब
अग्निशमन दलाच्या गाडीला झालेल्या विलंबाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळावरूनच तीव्र शब्दांत जाब विचारण्यात आला. "अशा प्रकारचा निष्काळजीपणा आणि ढिलाई पुन्हा सहन केली जाणार नाही," असा स्पष्ट इशारा अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तात्काळ मदतीची मागणी
या आगीत व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाशी चर्चा करून नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे पूर्ण करावेत आणि त्यांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी ठाम भूमिका घेण्यात आली आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages