सुखाच्या सुर्याचा उदय दिन... - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, May 1, 2026

सुखाच्या सुर्याचा उदय दिन...


महाराष्ट्राचा परिचय
संस्कृतीने मिळतो
मराठीचा पडघम
तिच्या सौंदर्याने गाजतो.... 

विदर्भ, कुंतल, अश्मक, लाट, अपरान्त अशा विविध नावांनी एकवटलेला देश म्हणजेच आमचा महाराष्ट्र.महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून व आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा जातो.मी या पावन दिनाला सुखाच्या सुर्याचा उदय दिन म्हणेल. महाराष्ट्र स्थापनेत कामगारांचे योगदान मोठे होते. त्यामुळे दोन्ही दिवस एकाच दिवशी साजरे करतात.

अठरापगड जातीच्या समाजबांधवांचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजीमहाराजांमुळे महाराष्ट्रातील लोकांचे एक राष्ट्र बनले आणि त्यांनी आपल्या पराक्रमाने स्वातंत्र्य प्राप्त केले. महाराष्ट्राच्या अंगचे धैर्य, शौर्य, चिकाटी समोर येवून सर्वत्र त्याचे नाव दुमदुमले. महाराष्ट्रात अनेक जाती व अनेक पंथ आहेत. परंतु महाराजांनी त्यांच्यातला विस्कळीतपणा घालवून त्या सर्वात ऐक्यभाव उत्पन्न केला होता ही त्यांची सर्वांत मोठी कामगीरी होती.प्रत्येक व्यक्तीची स्वत:संबंधीची आणि समाजासंबंधीची अशी दोन कर्तव्ये असतात. या दोन कर्तव्यांचा विरोध टाकून दोन्हींचा समन्वय कसा साधावा हे महाराजांनी महाराष्ट्राला शिकविले. 

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या स्वप्नातील महाराष्ट्र   साकारण्यासाठी अजून बरेच काही करायचे आहे.

देशात सर्वाधिक महानगरे असल्याचा मान महाराष्ट्राला मिळतो. स्त्रीशिक्षण, स्त्रीस्वातंत्र्य, उच्चशिक्षण, वैज्ञानिक संशोधन, तंत्रज्ञान, साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत महाराष्ट्रातील शहरांची भूमिका महत्त्वाची आहे.

आज कोरोना आजाराच्या हाहाकारात सर्वजण दडपले आहे 

कामगार बेरोजगारी च्या थापडांनी घायाळ आहे, आर्थिक अर्थव्यवस्था पुर्णता:हा खालावत आहे.आमचा कामगार वर्ग आर्थिक विवंचनेत डोळ्याला झापड येईपर्यंत नाकाच्या शेंड्याला धापा  येईपर्यंत कामासाठी धावतो परंतू आज त्यांची उपासमारी सुरू आहे. 

 एका बाजूला विविध क्षेत्रांमध्ये सर्वोच्च शिखरावर विराजमान झालेली उत्तुंग उंचीची  माणसे दिसतात आणि दुसरीकडे सर्वसामान्य माणूस आजही मूलभूत प्रश्नांच्या जंजाळातच अडकून पडलेला दिसतो. राज्यातील अनेक लोकांना दोनवेळच्या जेवणाची भ्रांत पडत आहे. अनेकांच्या डोक्यावर छप्पर नाही. तरूणांच्या हाताला काम नाही आणि दररोज शेतकरी आत्महत्या करीतच आहेत.अंधश्रद्धेपायी स्वत:च्या पोटच्या गोळ्याची हत्या,स्त्री भ्रूणहत्या, महिलांवरील अत्याचार, कुपोषणाचे बळी, आदिवासी मुलांचे मृत्यू, अशा अनेक घटना महाराष्ट्राच्या पावन विचारांना कलंक लावतात हे आमचे दुर्दैव म्हणावे लागेल. 

संकटे कोणतीही असली तरी ती पेलण्याची ताकद आम्हाला शिवरायांनी दिलेली आहे म्हणूनच तर राकट देशा, कणखर देशा’ असे या राज्याचे वर्णन मराठीचा शेक्सपियर म्हटले जाणाऱ्या राम गणेश गडकरी यांनी करून ठेवले असावे असे वाटते. 

महाराष्ट्राचा अभिमान आमची माय मराठी आहे. कोणत्याही जाती धर्माची परप्रांतीय मंडळी महाराष्ट्रात वास्तव्यास असेल तर त्यांना मराठी चा गोडवा जपता यायलाचं हवा. महाराष्ट्र आणि मराठी भाषेचे मोठेपण जपण्यासाठी नेमके काय करायला हवे, याचा शोध घेणे आवश्यक वाटते. 

महाराष्ट्राची व मराठीची मान उंचावणाऱ्या सर्वांना आदरपूर्वक अभिवादन करून महाराष्ट्रदिन व कामगारदिनानिमित्त सकल जनांना हार्दीक शुभेच्छा !!!


कंचन  मुरके,अमरावती

           अध्यक्ष 

 (महिला मंच, महाराष्ट्र प्रदेश) 

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages