चांदूर बाजार-
(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) दि.८ एप्रिल:-
राजकारणात मतभेद असणे स्वाभाविक असले तरी त्यातून थेट जीव घेण्याच्या पातळीवर जाण्याचे आरोप समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बच्चु कडु यांच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले असून पोलिसांनी त्यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे चुलत भाऊ अभिजीत तायडे यांना अपघाताचा बनाव रचून संपवण्याचा कट रचल्याचा आरोप बच्चू कडूंवर करण्यात आला आहे. या संदर्भातील एक कथित ऑडिओ क्लिप पोलिसांकडे जमा करण्यात आली असून त्याच्या आधारे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विकासकामांवरून राजकीय संघर्ष तीव्र?
गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेला अमरावती-परतवाडा मार्ग, विविध सिंचन प्रकल्प तसेच एमआयडीसीसंबंधित अनेक प्रश्न सध्या मार्गी लागत असल्याचा दावा स्थानिक पातळीवर केला जात आहे. तसेच फिनले मिल बंद पडणे आणि संत्रा प्रक्रिया उद्योगातील अपयश यांसारख्या मुद्द्यांवरूनही राजकीय वातावरण तापले असल्याचे दिसत आहे.भाजपकडून निषेध, सखोल चौकशीची मागणी
या प्रकरणामुळे लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली.अचलपूर मतदारसंघात गुंडागर्दी वाढू नये आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य बाहेर यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.यासाठी ब्राह्मणवाडा थडी येथील ठाणेदार जाधव व शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात ठाणेदार अमन शिरसट यांना निवेदन देण्यात आले आहे .यावेळी अशोकराव बनसोड भाजपा ज्येष्ठ नेते, हर्षल धुळे (मंडळ अध्यक्ष), संजय थेलकर (विधानसभा निरीक्षक), मनोहर सुने (माजी जि.प. सभापती), अतुल दारोकर (उपसरपंच), तसेच कांतीलाल सावरकर, प्रणित खवले, जगदीश पेठे, संजय पकळे, चंद्रशेखर खंडागळे, साहेबराव अस्वार, दीक्षित खाजोने, बंडूभाऊ अर्डक, शशांक वाठ, मनोज राजस, किरण जावरकर, मोंटू दाभाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.लोकशाहीसाठी चिंताजनक घडामोड
राजकारणातील स्पर्धा ही विकासाभोवती असावी, मात्र वैमनस्यातून गंभीर गुन्ह्यांचे आरोप होणे हे लोकशाहीसाठी निंदनीय असल्याचे मत व्यक्त होत आहे.या प्रकरणात पोलीस तपासानंतरच सत्य समोर येणार असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.