'मिशन लक्षवेध' अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी खेळाडूंची निवड चाचणी; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, March 17, 2026

'मिशन लक्षवेध' अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी खेळाडूंची निवड चाचणी;




30 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

            अमरावती, दि. १८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): ऑलिम्पिक स्तरावरील खेळांमध्ये महाराष्ट्राचे स्थान निर्माण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने 'मिशन लक्षवेध' योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रगत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने 'जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्रा'साठी कुस्ती, मैदानी (ॲथलेटिक्स) आणि शूटिंग या तीन क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंची निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीद्वारे प्रत्येक खेळातून 20 अशा एकूण 60 खेळाडूंची निवड केली जाणार असून, निवड झालेल्या खेळाडूंचा सराव, आहार, गणवेश, क्रीडा साहित्य आणि स्पर्धांचा प्रवास खर्च शासन उचलणार आहे.

या निवड प्रक्रियेसाठी 31 डिसेंबर 2026 रोजी 21 वर्षांखालील वय असलेले आणि गेल्या दोन वर्षात किमान राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सहभाग किंवा पदक मिळवलेले खेळाडू पात्र असतील. इच्छुक खेळाडूंनी आपले अर्ज जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, बोनाफाईड आणि पालकांचे संमतीपत्र यांसह 30 मार्च 2026 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, तपोवन चौक, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत सादर करणे आवश्यक आहे.

निवड चाचणीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे: दि. 8 एप्रिल रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे मैदानी खेळांची चाचणी होईल, दि. 9 एप्रिल रोजी जिल्हा क्रीडा संकुल, तपोवन चौक येथे कुस्तीची चाचणी, तर दि. 10 एप्रिल रोजी विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड येथे शूटिंगची चाचणी पार पडेल. सर्व चाचण्या सकाळी 8 वाजता सुरू होतील. या प्रक्रियेसाठी श्रीमती ममता कोळमकर (9823704347) यांची निवड चाचणी समिती प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र खेळाडूंनी या संधीचा लाभ घेऊन आपले अर्ज वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages