Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समृद्धी शेत पांदन रस्ते व जल पुनर्भरण योजनेची अंमलबजावणी सुरू

अमरावती, दि. ३ : जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या दळणवळणाची समस्या सोडविण्यासाठी आणि पाणी साठा वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संपूर्ण जिल्ह्यात 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समृद्धी शेत पांदन रस्ते व जल पुनर्भरण योजना' राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये बारामाही शेत रस्ते तयार करण्यात येणार असून, यासाठी स्थानिक नदी व नाल्यांमधील गाळ व साहित्याचा वापर केला जाणार आहे, यामुळे जलस्त्रोतांचे खोलीकरण होऊन पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

          योजना लोकसहभाग आणि शासकीय निधीच्या संयुक्त विद्यमाने राबविली जाणार आहे. योजनेसाठी प्रति किलोमीटर 9 लाख रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला असून, त्यापैकी 7.5 लाख रुपये शासन देणार आहे, तर उर्वरित 1.5 लाख रुपये संबंधित अशासकीय संस्थेला लोकसहभागातून उभे करावे लागणार आहेत. या कामासाठी रस्ते बांधणीचा अनुभव असलेल्या सेवाभावी संस्थांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. निवड झालेल्या संस्थांसोबत जिल्हाधिकारी कार्यालय सामंजस्य करार करणार आहे. या योजनेमुळे शेत रस्त्यांवरील अतिक्रमणे दूर होऊन शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेपर्यंत नेणे अधिक सुलभ होईल, असे उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Post a Comment

0 Comments