नागरिकांच्या आरोग्यासाठी सहाय्यभूत 'श्रीगणेशा आरोग्याचा' उपक्रमाची जिल्ह्यात सुरुवात dt.३०.०८.२०२५ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, August 29, 2025

नागरिकांच्या आरोग्यासाठी सहाय्यभूत 'श्रीगणेशा आरोग्याचा' उपक्रमाची जिल्ह्यात सुरुवात dt.३०.०८.२०२५


 



·         मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाद्वारे समन्वय

 

·         नागरिकांनी आरोग्य शिबीरांचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 

अमरावती, दि. ३० : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आणि मुख्यमंत्री सचिवालयाच्या सूचनेनुसार राज्यात सर्वत्र 'श्रीगणेशा आरोग्याचा' या विशेष उपक्रमाची गुरुवारपासून (ता.२८ ऑगस्ट) सुरुवात झाली आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पर्वात आरोग्य विभाग व गणेश मंडळांच्या सहाय्याने आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिरात केवळ आरोग्य तपासणी व उपचारच नव्हे, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि विविध शासकीय आरोग्य योजनांची व्यापक जनजागृती आणि मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात एकत्रितपणे आयोजित होणाऱ्या या आरोग्य शिबिरांमुळे हजारो नागरिकांना थेट लाभ होणार आहे.

या उपक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सकांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील  नोंदणीकृत रुग्णालये वेगवेगळ्या गणेश मंडळांशी समन्वय साधून आरोग्य शिबिरे आयोजित करणार आहेत. तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्रे ग्रामीण भागातील गणेश मंडळांसोबत सहभागी होत आरोग्य शिबिरे घेणार आहेत.

आरोग्य शिबिरांच्या ठिकाणी शहरी आणि ग्रामीण भागात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि इतर शासकीय योजनांची माहिती दर्शनी भागात प्रसारित केली जाणार आहे. धर्मादाय आयुक्त यांच्या अधिपत्याखालील धर्मादाय रुग्णालये प्रत्येकी दोन आरोग्य शिबिरे घेऊन या जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभागी होणार आहेत.

या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये नोंदणीकृत खाजगी रुग्णालयेही उत्स्फूर्तपणे अमरावती शहरात आरोग्य शिबिरे घेणार आहेत. विशेषतः नोंद घेण्यालायक म्हणजे, या उपक्रमांतर्गत शहरातील सायन्स कोर मैदानावर सलग आठ दिवस चालणारे आरोग्य शिबिर हे मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांच्या सक्रिय सहभागाने आयोजित होत आहे.

जिल्ह्यात ही मोहिम जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात राबविण्यात येणार असून निवासी उपजिल्हाधिकारी, धर्मादाय उपायुक्त, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनात उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवला जाणार आहे. या आरोग्य शिबिरांचा जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages