बँकांनी उद्योगाला कर्ज सुविधा देऊन अर्थव्यवस्थेला गती द्यावी -जिल्हाधिकारी आशिष येरेकर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, July 22, 2025

बँकांनी उद्योगाला कर्ज सुविधा देऊन अर्थव्यवस्थेला गती द्यावी -जिल्हाधिकारी आशिष येरेकर


*एक जिल्हा एक उत्पादन मान्यवरांना भेट देणार

अमरावती, दि २२  : केंद्र आणि राज्य शासनाने छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. सवलतीच्या दरात त्यांना कर्ज पुरवठा करून ग्रामीण भागातही उद्योग उभारणीला चालना देण्यात येत आहे. त्यामुळे बँकांनीही उद्योगांना कर्ज सुविधा देऊन अर्थव्यवस्थेला गती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.

जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने शासकीय विभाग आणि बँकांच्या अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी परिविक्षाधीन अधिकारी कौशल्या एन., अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, खादी ग्रामोद्योगचे व्यवस्थापक प्रदीप चेचेरे, कौशल्य विकासच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर, कृषी विभागाचे उपसंचालक वरूण देशमुख, पर्यटन विभागाचे विजय अवताडे, मावीमचे रंजन वानखेडे यांच्यासह विविध बँकांचे प्रादेशिक अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, देशाने पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष ठेवले आहे. त्यामुळे खाजगी क्षेत्रात बँकांना गुंतवणूक करावी लागणार आहे. यात बँकांचा सहभाग महत्त्वाचा राहणार आहे. बँकांनाही ही संधी समजून खाजगी क्षेत्रात सकारात्मक दृष्टिकोनातून काम करावे लागणार आहे. खाजगी क्षेत्रात गुंतवणूक करून नव्या नोकऱ्या निर्माण करणे गरजेचे आहे.

उद्योजकांना सुलभता व्हावी, यासाठी प्रत्येक बँकेत बिझनेस फॅसिलेशन सेंटर असणे गरजेचे आहे. या कक्षाच्या माध्यमातून गुंतवणूक प्रशिक्षण आदींबाबत माहिती देण्यात यावी. यासोबतच उद्योजकांकडून शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून दाखल करण्यात येणाऱ्या प्रस्तावात त्रुटी राहू नये, यासाठीही प्रयत्न करावे. बँकांनीही प्रभाव पडू शकतील, अशी क्षेत्रे निवडून त्या उद्योगांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करावेत.

यावेळी खादी ग्रामोद्योग, कृषी, पर्यटन, आर-सेटी, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटके महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र यांच्या उद्योग कर्जविषयक योजनांचा आढावा घेण्यात आला.

एक जिल्हा एक उत्पादन ही आता जिल्ह्याची ओळख झाली आहे. सर्व शासकीय कार्यक्रमात मान्यवरांच्या स्वागताला आता या भेटवस्तू देण्यात येतील. यासाठी सर्व विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या. यावेळी शासकीय योजनांचे कर्ज प्रकरण मंजूर करण्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. हेडाऊ यांनी प्रत्येक बँकेत बिझनेस फॅसिलेशन सेंटर उभारावे, तसेच विविध योजनांमध्ये माध्यमातून देण्यात येणारी कर्ज प्रकरणे निकाली काढावीत असे आवाहन केले. श्री. निकम यांनी प्रास्ताविक केले. श्री कादरी यांनी आभार मानले.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages