अमरावती, दि. ३० : नागपूर येथील महा-स्ट्राईड कार्यशाळेत अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांचा ‘महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाकरिता मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशक (Key Performance Indicators) निश्चित करणे’ या विषयावर उत्कृष्ट अहवाल सादर केल्याप्रित्यर्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच इतर विभागाचे प्रमुख अधिकारी यांची जागतिक बँक सहाय्यित महास्ट्राईड प्रकल्पासंदर्भात दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार, यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, वाशिमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. समिती सदस्य म्हणून सत्काराप्रसंगी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या, महसूल विभागामार्फत विविध प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून क्षेत्रिय स्तरावरील विविध स्तरांवरील विद्यमान कार्यपध्दती,योजनांची परिणामकारकता, कामकाजातील कार्यक्षमतेचे मुल्यांकन, माहिती व्यवस्थापन प्रणाली याचा सखोल अभ्यास करुन सुधारीत उपाययोजना व शिफारशी करण्याकरिता, राज्यातील सहा विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विषयवार समित्या गठीत करण्यात आल्या होत्या. त्यापैकी अमरावती विभागाच्या समितीकडे ‘विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाकरिता मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशक (Key Perfomance Indicotors) निश्चित करणे’ हा अत्यंत महत्वपूर्ण विषय देण्यात आला होता.
अमरावतीच्या समितीला दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री यांची प्रेरणा लाभली. अपर मुख्य सचिव (महसूल) यांनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. नोंदणी महानिरिक्षक तसेच जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख यांच्याशी मौल्यवान चर्चा करण्यात आली. या सर्वामुळे अत्यंत महत्वाचे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीला प्रेरक असणारे शासनाच्या अत्यंत महत्वपूर्ण अशा महसूल विभागाचे मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशके तयार करता आली. यासाठी नेमण्यात आलेल्या उपसमितीतील अध्यक्ष व सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यामुळेच या समितीला अत्यंत कमी वेळात हे कार्य (केपीआय अहवाल) पूर्ण करता आले, असे विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी सत्काराप्रसंगी सांगितले.
या समितीने तयार केलेले मुख्य कार्यप्रदर्शक निर्देशक (Key Performance Indicators) यांची अंमलबजावणी केल्यास विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने करावयाच्या कामाबाबत प्रत्येकाला स्पष्टता येईल आणि त्यांनी केलेल्या कामाचं मुल्यमापन जास्त अचूकपणे करता येईल, असा विश्वास विभागीय आयुक्त डॉ. सिंघल यांनी व्यक्त केला.

Post a Comment
0 Comments