माजी आमदार देवेंद्र भुयार यांचा विद्यमान आमदारांना संतप्त प्रश्न ?
येत्या दहा दिवसात रद्द झालेला निधी मंजुर करून आणावा
ग्रामीण उदय प्रतिनिधी :- मोर्शी -वरुड विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकांपूर्वी गावा व शहरांमध्ये प्रचंड विकास कामांची पूर्तता तत्कालीन आमदार देवेंद्र भुयार यांनी त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून केली.
न भूतो: न भविष्य: अशी मूलभूत व सामान्य नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने व प्रशासनाच्या दृष्टीने , त्याचबरोबर शेतकऱ्यांच्याही सोयीची कामे यानिमित्ताने या मतदारसंघात झालीत व आजही अनेक कामे प्रगतीपथावर आहेत.
जातीपाती धर्माच्या राजकारणात न अडकता, नौटंकी न करता केवळ मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास देवेंद्र भुयार यांनी उरी बाळगला होता. आणि म्हणूनच पाणीपुरवठा प्रकल्प असो,रस्ते विकास प्रकल्प असो, बंधाऱ्यांची कामे,असो पानंद रस्त्यांची कामे असो घरकुलांचे प्रश्न असो,मोर्शी,वरूड,शेंदुर्जना घाट या शहरातील विविध मूलभूत कामे रस्त्यांची कामे असो विद्युतीकरणाची कामे असो, भूमिगत विद्युतीकरणाची कामे असो, पुनर्वसनातील रस्त्यांची -नाल्यांची कामे असो, ग्रामीण रुग्णालय असो, तलाठी कार्यालय,असो किंवा तहसील कार्यालय, पर्यटन, वनविभाग, आरोग्य यंत्रणा सक्षम करणे असो,सामाजिक उपक्रमांची नांदी,विद्यार्थी व युवक युवतींसाठी वाचनालय अभ्यासिका, उद्यान आदी बाबी त्यांनी पूर्णत्वास नेल्या यात कोणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
गेली आठ महिने विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सुद्धा दिल्ली ते गल्लीपर्यंत सत्ता असणाऱ्या विद्यमान मोर्शी वरुड मतदारसंघाचे आमदार यांनी विकास कामे आणणे तर दूर परंतु देवेंद्र भुयार यांनी मोर्शी, वरूड ह्या तालुक्याच्या ठिकाण असणाऱ्या महत्त्वपूर्ण शहरातील व शेंदुर्जना घाट सारख्या मोठ्या शहरातील सुमारे १५ कोटींची विकास कामे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परीक्षेत्रात राहत अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा सुविधा पुरविण्यासाठी केलेला मंजूर निधी व कामे रद्द केली असल्यामुळे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी निषेध व्यक्त केला असून १० दिवसामध्ये आम्ही आम्ही मंजूर करून आणलेली विकासकामे विद्यमान आमदारांनी मंजूर करून दाखवावी असे प्रतिपादन माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी पत्रकार परिषदेद्वारे केले.
दिनांक २६ सप्टेंबर २०२४ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त नियोजन मंत्री अजित पवार यांना देवेंद्र भुयार यांनी वरील तिन्ही शहरातील विकास कामांसाठी १५ कोटीचा निधी अनुदानित कराव्या अशी विनंती केली होती,आणि याच अनुषंगाने १४ ऑक्टोंबर २०२४ रोजी सदर निधी शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२४/प्र. क्र. ८७(३६)/का. १४११, मंत्रालय मुंबई, नुसार मंजूर सुद्धा करण्यात आला.
सदर निधी केवळ रोड नाल्यांसाठी नव्हता तर समाजातील सर्व घटक, पंथ, यांना अपेक्षित असलेली विकास कामे व बहुउद्देशीय सभागृहे व तिथले सौंदर्यकरण व तिथली विकास कामे मंजूर झाली होती.
यामध्ये कुणबी, माळी, तेली, धनगर, जैन, मुस्लिम, बौद्ध, शीख, संताजी महाराज सभागृह,भोई समाज, शिंपी समाज, अनेक बुद्ध विहार,अनेक हिंदू मंदिरे, वरुड येथील राम मंदिर चित्तेश्वर मंदिर सती माता दुर्गा मंदिर लोणारी कुणबी समाज सावता महाराज मंदिर असे अनेक समाधानी मागणी केलेल्या परिसरातील स्थायी विकास कामांच्या मंजुराती या निमित्ताने झाल्या होत्या.
सदर कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणा कामी लागल्या असताना, विद्यमान आमदार उमेश यावलकर यांनी १९ मार्च २०२५ रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय यांना पत्र देत सदर शासन निर्णयान्वये मंजूर झालेली सर्व बहुजन व ओबीसी समाजाची विकास कामे न करता ज्या कामांमध्ये मलिदा मिळू शकतो अशी विकास कामे मंजूर करण्याची विनंती केली, या सर्व समाजाच्या व भाविक भक्तांच्या भावना तर विद्यमान आमदारांनी दुखावल्याच आहेत, परंतु पाठपुराव्या चा अभ्यास नसल्याने मंत्रालयातील प्रशासनाला व मंत्री महोदयांना सुद्धा यात केवळ कंत्राटदारांचा व आमदारांचा फायदा दिसून असलेली विकास कामे बहुदा निदर्शनास आली असावी. आणि म्हणून काय तर महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने शासन निर्णय क्र. संकीर्ण -२०२५/प्र. क्र. २१(९) /का-१४११,दि.२८ एप्रिल २०२५ निर्गमित करत सदर निधी अक्षरशः प्रशासकीय मान्यतेसह रद्द करण्याचा आदेश शासनाच्या सहसचिवांनी जारी केला.
निवडणुका झाल्यानंतर फक्त विकास कामांसाठी धडपडत असलेल्या देवेंद्र भुयार यांना जातीपातीच्या धर्माच्या राजकारणामुळे पराभवाचा सामना करावा लागला.
तत्कालीन आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या विकास कामांची मांदियाळी आजही सुरूच आहे. परंतु आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर यांच्याकडून मतदार संघातील मंजूर असलेली आयती विकासकामे सुद्धा पूर्ण करून घ्यावी असे वाटले नाही, आणि बहुजन समाजाची मन दुखावतील याचे सोयरे सुतुक त्यांना नाही अशा भावना आता जनसामान्यात व मंजूर असलेल्या विकास कामांच्या परिसरात राहणाऱ्या समाज घटकांनी व विविध संस्था व संघटनांनी व्यक्त केली आहे.
आमदारकीला आता नऊ महिने पूर्ण होणार असून सुद्धा स्वतःच्या पाठपुराव्याच्या जोरावर स्थानिक विकास निधी सोडता कुठलेही विशेष काम किंवा अर्थसंकल्पात एक नव्या रुपयाची तरतूद विद्यमान आमदार करू शकले नाही , आणि जी कामे यापूर्वीच मंजूर आहेत ती सुद्धा स्वार्थासाठी रद्द करण्याचा महाप्रताप त्यांनी या निमित्ताने केला आहे. या बाबीचा निषेध पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित सर्व समाजातील घटक व प्रतिनिधी आज करत असून, मागील पाच वर्षात मोर्शी वरुड मतदारसंघात झालेल्या प्रचंड विकास कामानंतर आता या मतदारसंघातील विकास कामांना सत्ताधारीच आमदार ब्रेक लावून मतदार संघाचा ड्रायझोन करणार का हा प्रश्न या पत्रकार परिषदेच्या वतीने विचारण्यात आले आहे यावेळी पत्रकार परिषदेला माजी आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य बाळू पाटील कोहळे, युवक जिल्हाध्यक्ष अंकुश घारड, तालुका अध्यक्ष विजय वडसकर, युवक तालुका अध्यक्ष निलेश गोमकाळे, जिल्हा उपाध्यक्ष तुषार देशमुख, शहराध्यक्ष देव बेलसरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप खडसे यांच्यासह मोर्शी वरूड शेघाट येथील शेकडो नागरिक उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments