अक्षय्य तृतीयेला बालविवाह केल्यास थेट तुरुंगवास - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, April 15, 2026

अक्षय्य तृतीयेला बालविवाह केल्यास थेट तुरुंगवास

 


*अमरावती जिल्हा प्रशासनाचा इशारा

अमरावती, दि. १६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): येत्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. बालविवाह लावल्यास थेट कारावासाची कारवाई करण्यात येणार आहे, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसेच बालविवाहासाठी संपूर्ण जिल्ह्यात विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.

जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयातर्फे शहर आणि ग्रामीण भागात मोहिम राबवली जात आहे. बालविवाह ही केवळ सामाजिक कुप्रथा नसून तो एक गंभीर आणि दखलपात्र गुन्हा आहे, याची जाणीव समाजात निर्माण करण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येणार आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार 18 वर्षांखालील मुलगी आणि 21 वर्षांखालील मुलगा यांचा विवाह लावणे हा दंडनीय गुन्हा आहे. अशा विवाहात सहभागी होणारे पालक, आयोजक, भटजी (गुरुजी) आणि इतर सर्व व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, शाळा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून विशेष देखरेख ठेवली जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागात प्रशासनाने यंत्रणेला हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी त्वरीत चाइल्ड हेल्पलाईन १०९८ वर संपर्क साधावा किंवा स्थानिक प्रशासनाला कळवावे. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णतः गोपनीय ठेवली जाईल, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट यांनी दिली आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages