‘अमृत' संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी 'परिवार सर्वेक्षण' मोहीम; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, April 7, 2026

‘अमृत' संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी 'परिवार सर्वेक्षण' मोहीम;

 





25एप्रिल पर्यंत नोंदणीचे आवाहन

अमरावती, दि. ०८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी दि. 8 एप्रिल ते 25 एप्रिल 2026 या कालावधीत 'परिवार सर्वेक्षण' अभियान राबविण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून लक्षित गटातील कुटुंबांची संख्या निश्चित करणे, त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे आणि भविष्यात नवनवीन लोककल्याणकारी योजनांची आखणी करणे हा मुख्य हेतू असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

'अमृत' संस्था प्रामुख्याने ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट, कानबी, कोमटी/वैश्य यांसारख्या 25 जातींमधील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्य करते. या संस्थेमार्फत व्यक्तिमत्व विकास, औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास, उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक अर्थसाहाय्य, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन आणि उद्योग-व्यवसाय वृद्धीसाठी वैयक्तिक व्याज परतावा योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे.

हे सर्वेक्षण महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी राबविले जाणार असून, या काळात अमृत संस्थेचे प्रतिनिधी थेट लक्षित गटातील कुटुंबांशी संपर्क साधतील. तसेच विविध सामाजिक संस्था, संघटना आणि मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडूनही प्रातिनिधिक स्वरूपात माहिती संकलित केली जाणार आहे. स्थानिक संसाधने आणि तरुणांच्या कौशल्यानुसार नवीन मूल्यवर्धित योजना तयार करण्यासाठी हे सर्वेक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

लक्षित गटातील ज्या कुटुंबांना किंवा संस्थांना या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी अमृतच्या जिल्हा किंवा विभागीय व्यवस्थापकांशी संपर्क साधून आपल्या परिवाराची नोंदणी करावी. या नोंदणीमुळे भविष्यात राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे सोपे होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन नोंदणी करावी, असे आवाहन 'अमृत' संस्थेमार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी  अमरावती जिल्हा व्यवस्थापक यांच्याशी  तसेच amrut.amravatidm@gmail.com या संकेतस्थळावर किंवा ९७३०१५१४५०  आणि ९११२२२६१५४  यावर संपर्क साधवा.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages