जिल्ह्यात 8 ते 14 एप्रिल दरम्यान 'सामाजिक समता सप्ताह'; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, April 7, 2026

जिल्ह्यात 8 ते 14 एप्रिल दरम्यान 'सामाजिक समता सप्ताह';

 



विविध लोककल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन

अमरावती, दि. ०८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात दि. 8 एप्रिल ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत 'सामाजिक समता सप्ताह' साजरा करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये या सप्ताहाचे नियोजन करण्यात आले असून, समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी कळविले आहे.

या सप्ताहाची सुरुवात 8 एप्रिल रोजी उद्घाटन समारंभाने होणार असून 9 एप्रिलला जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळा व वसतिगृहामध्ये निबंध, वक्तृत्व आणि लघुनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येईल. 10 एप्रिल रोजी समतादूतांच्या माध्यमातून पथनाट्ये सादर करून सामाजिक न्याय विभागाच्या 'मार्जिन मनी' योजनेसह इतर महत्त्वाच्या योजनांचे प्रबोधन केले जाईल. 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सामाजिक कार्यावर आधारित विशेष कार्यक्रम होतील. 12 एप्रिल रोजी 'संविधान जागर' अंतर्गत भारतीय संविधानाची माहिती व महिला मेळाव्याचे आयोजन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महिलाविषयक कार्य अधोरेखित केले जाईल.

सप्ताहाच्या उत्तरार्धात 13 एप्रिलला ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर आणि स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल, ज्यामध्ये मान्यवरांची व्याख्याने व चर्चासत्रे होतील. विशेष म्हणजे, या सप्ताहात 'अॅट्रॉसिटी' कायद्यांतर्गत वारसांना नियुक्ती आदेश देणे, दादासाहेब गायकवाड योजनेतून जमिनीच्या पट्ट्यांचे वाटप, 'बार्टी'च्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार असे कार्यक्रम होणार आहेत. या सर्व उपक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages