Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

११ एप्रिल महात्मा फुले जयंती निमित्ताने.... समाजातील कोहिनूर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले "

 



दि.११ :-

  भारतातील परंपरागत समाज संस्थांच्या विरुद्ध बंड करणारे पहिले बंडखोर, भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक स्त्रियांच्या हक्कासाठी लढणारे आणि शेतकरी कामकरी चळवळ उभारणारे पहिले पुढारी म्हणून ज्योतिबा फुले आहे. महाराष्ट्राची भूमी ही वीर आणि संतांची भूमी आहे. अनेक महामानव देखील इथे होऊन गेले ज्यांनी अनेक अत्याचार अन्याय सहन करून समाज सुधारण्याचे कार्य केले आहे .अशा या महान व्यक्ती पैकी एक  म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आहे.

११ एप्रिल १८२७  ला पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला त्यांचे वडील फुले विकत म्हणून फुले आडनाव पडले महात्मा ज्योतिबा फुले यांना लहानपणापासूनच शिक्षणाची प्रचंड आवड होती प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा सुद्धा व्यवसाय केला, त्यांची अतिशय तल्लख बुद्धी होती. महात्मा ज्योतिबा फुले नऊ महिन्याचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले होते. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह सावित्रीबाई सोबत झाला. तत्कालीन काळात मागासलेल्या जातीमध्ये शिक्षित होणे त्यातही मुली शिकणे हे पाप आहे असे सर्वसामान्य जनतेच्या मनावर ठसवले जात होते मुलीनी शिक्षण घेतले तर त्या अक्षरांच्या अळ्या होऊन त्यांच्या पतीच्या पोटामध्ये दुखते अशा प्रकारचे गैरसमज पसरविण्यात आले. अशा बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा ज्योतिबा फुले मागे हटले नाहीत आपल्या विचारांवर ठाम राहिले ते स्वतः पण शिकले आणि सावित्रीबाईंना सुद्धा त्यांनी शिकवले. समाजातील अज्ञान, जातीभेद दारिद्र्य पाहून सामाजिक स्थिती सुधारण्याचा त्यांनी निर्णय घेतला. समाजातील विषमता दूर करण्यासाठी शिक्षण अत्यंत आवश्यक आहे हे त्यांनी ओळखले. मागासलेल्या जातीमध्ये मुला मुलींच्या शिक्षणावर त्यांनी भर दिला. समाजाचा प्रचंड विरोध असताना त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. अशा कठीण स्थितीमध्ये शाळा काढणे अत्यंत कठीण काम होते. आपणा सर्वांना माहित आहे सावित्रीबाई फुले यांनी अंगा खांद्यावर शेणाचे गोळे झेलून मुलींना शिकवण्याचे कार्य केले आहे .एवढ्या पुरते मर्यादित नसून पदोपदी अपमान सहन करावा लागला लोकांची बोलणी ऐकावी लागली तरीही त्यांनी आपला  निर्णय ठाम ठेवला. महात्मा ज्योतिबा फुले नेहमी सांगत

"प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला 

तेच पोहू  शकतात 

ज्यांचे निर्धार ठाम असतात 

त्यांना कुठेतरी ध्येय गाठायचे असते "

शिक्षणाने माणूस विवेकशील व संवेदनशील बनतो, शिक्षणा अभावी माणूस मानवी हक्क प्रतिष्ठा दर्जा यांना पारखा होतो हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती होते म्हणून  समाज सुधारण्यासाठी शिक्षणावर त्यांनी खूप भर दिला होता.

महात्मा ज्योतिबा फुले स्वतः शेतकरी होते. शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांनी अनुभवल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी खूप लढा दिला. शेतकरी हा पूर्ण समाज व्यवस्थेचा कणा आहे पण तोच अज्ञान अंधश्रद्धेच्या भारांनी वाकला आहे. त्याच्या ताठपणावरच सर्व समाजाचे जीवन अवलंबून असते हे त्यांनी ओळखले होते. या अज्ञानाची पाळमूळ जितक्या लवकर दूर होतील तितकी गती समाज सुधारण्यास प्राप्त होईल, त्यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय होता हे त्यांनी जाणले होते. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन भाकड कथा सांगून लुबाडणाऱ्या, फसविणाऱ्या उच्चवर्णीय यांना आसूडचा प्रसाद मिळाला पाहिजे यासाठी त्यांनी "शेतकऱ्यांचे आसूड" हे पुस्तक लिहिले. 

त्या काळात मुला मुलींमध्ये भेदभाव मोठ्या प्रमाणात होता. विधवांचे केस काढणे, विधवांना अपमानास्पद वागणूक देणे अशा प्रकारची व्यवस्था होती. महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला एकत्रित करून विधवांचा पुनर्विवाह करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि गोखले बागेमध्ये सर्वप्रथम विधवा विवाह १८६४ मध्ये घडवून आणला. समाजामधील विषमता नष्ट करण्याचे प्रयत्न ज्योतिबा सावित्रीबाईंनी खूप केले परंतु विचार केला तर आजही विषमता नष्ट झाली का? मुला मुलींमध्ये भेदभाव नष्ट झाला का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारावा लागेल. आजच्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची आपल्या समाजाला, देशाला अत्यंत गरज आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्वप्न आपला समाज, देश जाती विरहित होईल असे होते, जातीभेद संपुष्टात येईल असे होते, तेव्हा या बदलाची सुरुवात आपण स्वतः पासून करायला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले कृतीशील विचारवंत होते त्यांची दूरदृष्टी होती आणि याचीच आज आपल्या समाजाला गरज आहे.

महात्मा फुले यांनी एकाच वेळी शेतकरी, शिक्षण, स्त्रिया, धर्म, जात व्यवस्था, पुरोहित शाही अशा अनेक विषयांवर काम केले. आज महात्मा फुले यांचे तेजस्वी क्रांतिकारक जीवन नव्या पिढीला समजून सांगणे सर्वात महत्त्वाचे आहे.  महिलांचे आराध्य दैवत महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले आहेत हे महिलांनी आजन्म लक्षात ठेवायला पाहिजे व त्याबद्दल कृतज्ञ असायला पाहिजे. याची जाण त्यांना समाज माध्यमांमधून करून देणे सुद्धा आवश्यक आहे. 

 मुलींचे शिक्षण, वाढते कर्मकांड, परंपरेची जोखड यावर चर्चा करायला हव्यात. नव्या पिढीला विचारी, विवेकी, कृतिशील व बुद्धिप्रामाण्यवादी बनवण्यासाठी क्रांती घडवून आणणे आज गरजेचे आहे. आज आम्हा स्त्रियांना महात्मा फुले यांच्या विचारांची फार गरज आहे. हा लेख वाचून समाजातील सुज्ञ, जबाबदार स्त्री वर्गाला आत्मचिंतन करावसं वाटलं तर माझे लिखाण सार्थक झाले असे मला वाटेल.


सौ. सुरेखा दामेधर

  अध्यक्ष 

विदर्भ (पश्चिम)

 अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महिला मंच

Post a Comment

0 Comments