ज्ञानोदय विद्या मंदिर भक्तीधाम चांदूर बाजार येथे शिक्षण तज्ञ वारे गुरुजी यांचे शिक्षकांशी संवाद - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, April 5, 2026

ज्ञानोदय विद्या मंदिर भक्तीधाम चांदूर बाजार येथे शिक्षण तज्ञ वारे गुरुजी यांचे शिक्षकांशी संवाद




 चांदूर बाजार, दि. ६ एप्रिल २०२६ :

   संत श्री गुलाबराव महाराज भक्तिधाम, चांदूर बाजार या तीर्थक्षेत्री “शिक्षकांशी संवाद” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन दि. ४ एप्रिल ला  करण्यात आले होते. या कार्यक्रमात जि.प. प्राथमिक शिक्षक श्री. दत्तात्रय वारे गुरूजी यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करत आदर्श शिक्षक कसा असावा याचे प्रभावी उदाहरण मांडले.

  वारे गुरूजी यांनी आपल्या कार्यातून इच्छाशक्तीच्या बळावर शाळांमध्ये आमूलाग्र बदल कसा घडवता येतो हे स्पष्ट केले. त्यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वतःचा वेळ, पैसा आणि संपूर्ण समर्पण खर्च करून अनेक शाळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचे कार्य केले आहे. निस्वार्थ भावनेने कार्य करत असताना त्यांना काही अडचणींनाही सामोरे जावे लागले. स्थानिक पातळीवर भ्रष्टाचाराचे आरोप व शासकीय निलंबन यांसारख्या प्रसंगांना सामोरे जाऊनही त्यांनी आपली प्रामाणिक सेवा अखंडपणे सुरू ठेवली. त्यांच्या कार्यातून महाराष्ट्रातील अनेक शाळांना नवसंजीवनी मिळाली असून उपस्थित शिक्षकांनाही प्रेरणा मिळाली.

   कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष यांनी आदर्श शाळा घडवण्यासाठी आदर्श शिक्षकांची गरज अधोरेखित केली. “फक्त १० ते ५ नोकरी करून आदर्श शाळा निर्माण होऊ शकत नाही, त्यासाठी मेहनत व समर्पण आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.

    यावेळी शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबविणारे संस्थाप्रमुख मा. राजाभाऊ देशमुख तळवेलकर व भक्तिधामचे अध्यक्ष मा. इंजि. रविंद्रजी इंगोले यांच्या हस्ते वारे गुरूजींचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. विनायकराव खांडे सर व संस्थेचे सचिव श्री सतिशराव मोहोड सर प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राजाभाऊ देशमुख शिक्षण संस्थेचे धडाडीचे शिक्षक श्री. तुषार देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन ज्ञानोदय विद्या मंदिर, भक्तिधाम यांनी केले होते.

   ज्ञानवंतांचा सत्कार व विचार ऐकण्याची परंपरा संस्थेचे संस्थापक वै. नानाजी इंगोले यांनी सुरू केली असून ती परंपरा आजही विद्यमान अध्यक्ष रविंद्रजी इंगोले यांनी जपल्याने परिसरामध्ये आनंदाचे वातावरण आहे . 

या कार्यक्रमास चांदूर बाजार व वरूड तालुक्यातील मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages