Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

भगवान परशुराम: क्रांती आणि शांतीचा महासंगम





 परशुराम जयंती २०२६ 

 अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर परशुराम जयंती साजरी केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, परशुरामांचा जन्म वैशाख शुद्ध तृतीयेला प्रदोष काळात झाला होता. 

 'अमर' अवतार (सप्तचिरंजीव)

हिंदू धर्मात परशुरामांना 'चिरंजीव' मानले जाते. म्हणजेच ते आजही पृथ्वीवर सदेह अस्तित्वात आहेत, अशी श्रद्धा आहे. पौराणिक कथांनुसार, ते कलियुगाच्या शेवटी होणाऱ्या 'कल्की' अवताराचे गुरु असतील आणि त्यांना शस्त्रास्त्रांचे शिक्षण देतील.

माता रेणुका आणि जमदग्नी ऋषी

भगवान परशुराम हे महर्षी जमदग्नी आणि माता रेणुका यांचे पाचवे पुत्र होते. माता रेणुका अत्यंत पतिव्रता होती. त्या काळी त्या आपल्या तपोबलाने पाण्याने भरलेला कच्च्या मातीचा घडा घेऊन येत असत. एकदा नदीवर पाणी भरण्यासाठी गेल्या असता, तिथे गंधर्वांचे क्रीडा चालली होती, ते पाहून रेणुका मातेच्या मनात क्षणभर मोह उत्पन्न झाला. यामुळे त्यांचे तपोबल कमी झाले आणि तो मातीचा घडा फुटला.

 विदर्भातील माहूर (नांदेड जिल्हा) हे माता रेणुकेचे शक्तिपीठ परशुरामांच्या जन्मकथेशी जोडलेले आहे. असे मानले जाते की, पित्याच्या आज्ञेवरून आईचा वध केल्यानंतर, परशुरामांनी याच भागात तपश्चर्या केली होती.

पितृआज्ञा आणि परशुरामांची कसोटी
जेव्हा रेणुका माता आश्रमात रिकाम्या हाताने परतल्या, तेव्हा महर्षी जमदग्नींनी आपल्या अंतर्ज्ञानाने सर्व जाणून घेतले. क्रोधाच्या भरात त्यांनी आपल्या चारही मोठ्या पुत्रांना आईचा वध करण्याची आज्ञा दिली, परंतु त्यांनी ती नाकारली. शेवटी त्यांनी परशुरामांना बोलावले. परशुरामांनी आपल्या पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानली आणि आपल्या परशूने (कुऱ्हाडीने) मातेचा शिरच्छेद केला.

  मिळालेले वरदान

परशुरामांच्या या आज्ञापालनावर जमदग्नी ऋषी अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी परशुरामांना वर मागण्यास सांगितले. परशुरामांनी अत्यंत चतुराईने तीन वर मागितले:

माझी माता पुन्हा जिवंत व्हावी.

तिला मी मारल्याचे आठवू नये (तिच्या मनातून भीती जावी).

माझ्या भावांना पुन्हा शुद्धीवर आणावे.

ऋषींनी हे वर पूर्ण केले आणि माता रेणुका पुन्हा जिवंत झाली. ही कथा परशुरामांची 'पितृभक्ती' दर्शवते, जिथे त्यांनी आपल्या पित्याच्या रागाचे शमन करून आईला पुन्हा जीवन मिळवून दिले.

सहस्त्रार्जुन आणि पृथ्वी निःक्षत्रिय करण्याची कथा
दुसरी महत्त्वाची कथा म्हणजे कार्त्तवीर्य अर्जुन (सहस्त्रार्जुन) या राजाची. त्याने महर्षी जमदग्नींकडे असलेली 'कामधेनु' गाय चोरून नेली आणि आश्रमाचा अपमान केला. याचा सूड घेण्यासाठी परशुरामांनी सहस्त्रार्जुनाचा वध केला. प्रत्युत्तरादाखल सहस्त्रार्जुनाच्या पुत्रांनी जमदग्नी ऋषींची हत्या केली. या घटनेमुळे संतप्त होऊन परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा 'निःक्षत्रिय' (अन्यायी क्षत्रियांपासून मुक्त) करण्याची प्रतिज्ञा केली होती.

 कोकण भूमीची निर्मिती

सर्व पृथ्वी जिंकल्यानंतर त्यांनी ती कश्यप ऋषींना दान केली आणि स्वतःसाठी राहण्यास जागा नसल्याने समुद्राला मागे हटण्याची विनंती केली. समुद्राने जागा देण्यास नकार दिल्यावर त्यांनी प्रत्यंचा ओढून बाण सोडला, ज्यामुळे समुद्र मागे हटला आणि 'परशुराम क्षेत्र' (कोकण) निर्माण झाले.

परशुरामांनी आपल्या परशूने (कुऱ्हाडीने) समुद्र मागे सारून सात कोकण (सप्तकोंकण) भूमी निर्माण केली, अशी दाट श्रद्धा आहे. आजही चिपळूण (रत्नागिरी) येथील लोटे परशुराम मंदिर हे त्यांचे मुख्य स्थान मानले जाते.

 पर्यावरणाचे पहिले रक्षक
आज आपण 'लँड रिक्लेमेशन' (समुद्रातून जमीन मिळवणे) बद्दल बोलतो, पण हजारो वर्षांपूर्वी परशुरामांनी कोकणची निर्मिती करून हे करून दाखवले होते. कोकणची भूमी ही परशुरामांनी केवळ युद्धासाठी नाही, तर कृषी आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी समुद्राकडून मिळवली होती. त्यांनी विखुरलेल्या समाजाला एकत्र करून तिथे वस्ती वसवली म्हणूनच त्यांना 'कोकणचे निर्माते' म्हटले जाते.

 शस्त्रास्त्र आणि शास्त्रांचे ज्ञाता

परशुराम हे केवळ युद्धकलेत निपुण नव्हते, तर ते वेदांचे महान पंडित होते. त्यांनी 'कलारीपयट्टू' या जगातील सर्वात प्राचीन युद्धकलेची निर्मिती केली, जी आजच्या सर्व 'मार्शल आर्ट्स'ची जननी मानली जाते. एका हातात 'परशू' (कुऱ्हाड) आणि दुसऱ्या हातात 'वेद' हे चित्र आपल्याला संदेश देते की, सामर्थ्याशिवाय ज्ञान सुरक्षित नसते आणि ज्ञानाशिवाय सामर्थ्य हे आंधळे असते.

 भारतीय संस्कृतीमध्ये अनेक अवतार झाले, पण 'परशुराम' हे व्यक्तिमत्व सर्वात वेगळे ठरते. ते केवळ विष्णूचे सहावे अवतार नाहीत, तर ते 'ब्राह्मतेज' आणि 'क्षत्रतेज' यांचा अपूर्व संगम आहेत. बहुतांश लोक त्यांना केवळ 'क्रोधित ऋषी' म्हणून ओळखतात, पण त्यांच्या चरित्राचे काही पदर आजही अनेकांना माहित नाहीत.
परशुरामांचे युद्ध कोणत्याही राज्यासाठी किंवा सत्तेसाठी नव्हते. त्यांचे युद्ध हे 'अहंकारी सत्ते' विरुद्ध होते. ज्यावेळी राजसत्ता प्रजेचे रक्षण करण्याऐवजी शोषण करू लागली (सहस्त्रार्जुनाचे उदाहरण), तेव्हा एका ऋषीपुत्राने हातात शस्त्र घेतले. परशुराम हे जगातील पहिले असे योद्धे आहेत ज्यांनी सिद्ध केले की, "जर शास्त्र (ज्ञान) संकटात असेल, तर शस्त्राचा वापर करणे हाच खरा धर्म आहे."
 चिरंजीव: काळाच्या पलीकडचे गुरु
परशुराम हे 'सप्तचिरंजीव' पैकी एक आहेत. रामायणात ते प्रभू रामाला शिवधनुष्य तोडल्यानंतर भेटतात, महाभारतात ते भीष्म आणि कर्णासारख्या महान योद्ध्यांचे 'गुरु' म्हणून समोर येतात. आणि भविष्यात ते 'कल्की' अवताराला मार्गदर्शन करतील अशी श्रद्धा आहे. याचा अर्थ असा की, परशुराम हे केवळ एका युगापुरते मर्यादित नसून ते प्रत्येक युगातील 'अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचे' प्रेरणास्थान आहेत.
अनेकांचा समज आहे की परशुराम एका विशिष्ट वर्गाचे होते, पण त्यांनी ज्यांना युद्धकला शिकवली, ज्यांना जमिनी दिल्या आणि ज्या समाजाचे रक्षण केले, तो समाज अत्यंत व्यापक होता. त्यांनी शोषित आणि पीडित समाजाला शस्त्र चालवण्याचे शिक्षण देऊन स्वसंरक्षणाचे धडे दिले.
परशुराम जयंती म्हणजे केवळ एका देवतेचा जन्मोत्सव नाही, तर तो 'स्वत्व' आणि 'सामर्थ्य' जागृत करण्याचा दिवस आहे. "शांतीसाठी शक्ती हवी" हा वैश्विक विचार भगवान परशुरामांनी आपल्या कृतीतून जगाला दिला आहे.

Post a Comment

0 Comments