Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

'कौशल्याचा सन्मान, दिव्यांगांचा स्वाभिमान' उपक्रमांतर्गत दिव्यांग नोंदणी शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद



अमरावती, दि. २६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): दिव्यांग तरुणांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी जिल्ह्यात विशेष नोंदणी व मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन नुकतेच करण्यात आले. 'कौशल्याचा सन्मान, दिव्यांगांचा स्वाभिमान' हे ब्रीदवाक्य समोर ठेवून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने  जिल्ह्यातील तीन

 केंद्रांवर ही सत्रे पार पडली. यामध्ये डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय (चपराशीपुरा), सत्यशोधक बहुद्देशीय शिक्षण संस्था (मासोद) आणि राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था (मार्डी रोड) यांचा समावेश होता. या तिन्ही केंद्रांवर मिळून एकूण २५० दिव्यांग उमेदवारांची नोंदणी पूर्ण करण्यात आली.

या शिबिरात केंद्र शासनाच्या 'नॅशनल करिअर सर्विस' पोर्टलवर उमेदवारांची जागीच नोंदणी करण्यात आली. यामुळे या तरुणांना आता स्थानिक पातळीसोबतच देशपातळीवरील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जिल्हा कौशल्य विकास केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी उपस्थित उमेदवारांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. तसेच, खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि स्वयंरोजगारासाठी उपलब्ध असलेल्या आर्थिक पर्यायांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

 डॉ. नयना कडू, कौशल्य विकास अधिकारी संदीप यादव, मुख्याध्यापक महापात्रा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दिव्यांगांनी आत्मविश्वासाने स्वावलंबनाकडे वाटचाल करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

 


Tags

Post a Comment

0 Comments