अवैध रेती उत्खनन करणारे जेसीपी व ट्रॅक्टर जप्त
चांदूर बाजार, दिनांक २४ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
तालुक्यातील हिरुळ पूर्णा येथील रेती घाटावर काल सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पोलीस आणि महसूल विभागाने संयुक्तपणे मोठी कारवाई केली. या कारवाईत अवैध उत्खनन करणारा एक जेसीपी (JCB) आणि विनापरवाना रेती वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून, दोन्ही वाहने चांदूर बाजार पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहेत.
चांदूर बाजार पोलीस स्टेशनचे नवनियुक्त IPS अधिकारी सागर भामरे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवण्यात आली. हिरुळ पूर्णा घाटावर मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, पोलीस पथकाने आज अचानक धाड टाकली. यावेळी घटनास्थळी एक जेसीपी मशीन उत्खनन करताना आणि एक ट्रॅक्टर विनापरवाना रेतीची वाहतूक करताना आढळून आला.
या धडक कारवाईत पोलीस विभागाकडून ठाणेदार अशोक जाधव, पीएसआय विनोद इंगळे व त्यांच्या पथकाचा समावेश होता. तसेच महसूल विभागाच्या वतीने तहसीलदार सोनल सूर्यवंशी, मंडळ अधिकारी भारत पर्वतकर आणि ग्राम महसूल अधिकारी रूपाली गावंडे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून वाहनांचा जप्तीनामा व पंचनामा करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
नवनियुक्त आयपीएस अधिकारी सागर भामरे यांच्या या पहिल्याच मोठ्या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आगामी काळातही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Post a Comment
0 Comments