मेळघाटच्या विकासासाठी रोजगार मेळावा महत्त्वपूर्ण असल्याचे
आमदार केवलराम काळे यांचे प्रतिपादन
अमरावती, दि. २६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती, मॉडेल करिअर सेंटर आणि व्हिजन एज्युकेशन अकादमी, धारणी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मातोश्री इंदिरा महाविद्यालयाच्या रंग भवन सभागृहात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार केवलराम काळे आणि धारणीचे प्रकल्प संचालक सिद्धार्थ शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना आमदार केवलराम काळे म्हणाले की, मेळघाटमध्ये मोठ्या स्वरूपाच्या रोजगार मेळाव्याचे आयोजन होत आहे. या दुर्गम आणि आदिवासी भागाचा खऱ्या अर्थाने विकास हा तरुणांना रोजगार मिळाल्यानेच होऊ शकतो. त्यामुळे विविध कंपन्यांनी या भागातील उमेदवारांना संधी देऊन मेळघाटच्या प्रगतीला हातभार लावावा.
सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी आपल्या प्रास्ताविकेत धारणी आणि चिखलदरा सारख्या आदिवासी पट्ट्यात यापुढेही रोजगार मेळावे आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
या मेळाव्यात स्विगी, नवभारत फर्टिलायझर, जावील सर्किट, टी.एस.पी.एल. यांसारख्या एकूण 20 नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. 355 रिक्त पदांसाठी 514 उमेदवारांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी 113 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. 5 उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते तात्काळ नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व्हिजन अकादमीचे राजकिशोर मालवीय होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणाल मालवीय, सुभाष गुल्हाने आणि महाविद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आकांशा प्रभे यांनी तर आभार प्रा. सोनकर यांनी मानले.
Post a Comment
0 Comments