शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे व्हीएलएसआय चिप डिझाइन कार्यशाळा संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, February 20, 2026

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे व्हीएलएसआय चिप डिझाइन कार्यशाळा संपन्न






अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची व्याप्ती वाढत असताना, या क्षेत्रातील तांत्रिक कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावतीच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी विभाग आणि पुणे येथील 'एजूस्फियर सिस्टिम्स' यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीय व अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेली ‘इलेक्ट्रॉनिक डिसाईन ऑटोमेशन टूल्सचा वापर करून सेमीकंडक्टर संकल्पना ते फ्रंट-एंड आणि बॅक-एंड इंडस्ट्री रेडी व्हिएलयसआय (VLSI) चिप डिझाइन’ ही तीन दिवसीय कार्यशाळा येथे नुकतीच संपन्न झाली.

               प्राचार्य डॉ. आशिष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना चिप डिझाइनमधील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि उद्योगक्षेत्रातील गरजांशी अवगत करणे हा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारत सरकार देशात सेमीकंडक्टर क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्यातील अभियंत्यांना या क्षेत्रातील मूलभूत संकल्पना, ऑपरेटिंग तत्त्वे आणि हार्डवेअर प्रोग्रामिंगचे सखोल ज्ञान मिळावे यासाठी हे हँड्स-ऑन प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरले.

             या तीन दिवसांच्या कालावधीत सुमारे 120 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना मायक्रोविंड , डिव्हाईस स्केमॅटिक, स्पाइस आणि व्हिवाल्डो यांसारख्या अद्ययावत सॉफ्टवेअर्सचा वापर करून चिप डिझाइन आणि प्रोग्रामिंगचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. तसेच एफपीजिये (FPGA) आणि ऍसिक (ASIC) यांसारख्या जटिल प्रणाली कशा कार्य करतात, याचे प्रात्यक्षिक ज्ञानही त्यांना देण्यात आले.

               विभागाचे प्रमुख डॉ. पी. आर. देशमुख यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचे  नियोजन समन्वयक प्रा. विवेक राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी वृंदाने विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांचे आणि विभागाच्या उपक्रमाचे प्राचार्य डॉ. महल्ले यांनी कौतुक करून सर्वांचे अभिनंदन केले. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक कौशल्येच मिळाली नाहीत, तर उद्योगांमध्ये थेट प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वासही प्राप्त झाला आहे.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages