‘जनसंवाद’मध्ये 1200 नागरिकांनी मांडल्या समस्या - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, February 19, 2026

‘जनसंवाद’मध्ये 1200 नागरिकांनी मांडल्या समस्या




*‘जनसंवाद’ला जिल्ह्यात मिळाला उत्स्फुर्त प्रतिसाद

* जागेवरच 137 निकाली, गावातच ऐकल्या समस्या

अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या समस्या निवारणासाठी दि.१८ तारखेला एकाच दिवशी तालुकास्तरावर 'जनसंवाद व तक्रार निवारण' कार्यक्रम पार पडला. जिल्ह्यातील 14 तालुक्यात 1197 तक्रारी प्रत्यक्ष येऊन समस्या मांडल्यात. यातील 137 तक्रारींवर जागेवरच समाधान करण्यात आले.

जिल्ह्यातील आज पार पडलेल्या तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. अमरावती तालुक्यात 52, तिवसा 35, भातकुली 56, दर्यापूर 85, अंजनगाव सुर्जी 123, अचलपूर 76, चांदुर बाजार 48, धारणी 43, चिखलदरा 80, मोर्शी 76, वरूड 110, चांदुर रेल्वे 136, धामणगाव रेल्वे 134, नांदगाव खंडेश्वर 43 अशा एकुण 997 तक्रारी नागरीकांनी दाखल केल्या.

अचलपूर येथे आमदार प्रविण तायडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, उपविभागीय अधिकारी बळवंत अरखराव, मोर्शी येथे उपजिल्हाधिकारी प्रसेनजित चव्हाण, नांदगाव खंडेश्वर येथे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसिलदार अश्विनी जाधव, अमरावती येथे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, तहसिलदार विजय लोखंडे आदींनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.

धारणी तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत जनसंवाद कार्यक्रम पार पडला. यात ग्रामीण ते शहरी भागातील नागरिकांनी विविध विभागांशी संबंधित समस्या थेट प्रशासनासमोर मांडल्या. विशेषतः वीज वितरण, जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा, जलसंधारण, महसूल, शिक्षण, घरकुल योजना, पुनर्वसन, तसेच गॅस वितरणाशी निगडीत तक्रारींचा समावेश होता.

धारणी येथील कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, धारणी नगरपंचायत अध्यक्ष सुनील चौथमल, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुनिल जाधव, तहसिलदार प्रदीप शेवाळे, गटविकास अधिकारी विजय गायकवाड आदी उपस्थित होते. नागरिकांनी शासन दरबारी आपल्या तक्रारी अधिकृतपणे नोंदविल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती महापात्र यांनी प्राप्त तक्रारींचा आढावा घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून तात्काळ निकाली काढण्याचे निर्देश दिले. या उपक्रमात नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. जनसंवादाच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न होत आहे.

जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांच्या वैयक्तिक आणि सार्वजनिक तक्रारी, विविध विकास कामांची सद्यस्थिती, प्रलंबित प्रस्ताव आणि स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला गेला. तसेच तहसील, जिल्हा परिषद, तालुक्यातील सर्व विभागांचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसचिव आणि कृषी सहाय्यकांनी उपस्थिती दर्शवून नागरिकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले.

जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरीय जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी समन्वयक अधिकारी नेमून त्यांना तालुकानिहाय जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या मार्गदर्शनात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages