रेशन कार्डधारकांना दिलासा: आता मिळणार ३ किलो गहू, २ किलो तांदूळ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, January 15, 2026

रेशन कार्डधारकांना दिलासा: आता मिळणार ३ किलो गहू, २ किलो तांदूळ


दि. १६ अमरावती ।(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):-

अमरावती जिल्ह्यातील रेशन कार्डधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, या महिन्यापासून प्रति व्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ असा धान्यपुरवठा करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत असलेली मागणी अखेर पूर्ण झाली असून, येत्या रविवारपासून बहुतेक रेशन दुकानांतून नवीन प्रमाणानुसार धान्यवाटपाला सुरुवात होणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात रेशन कार्डधारकांना दरमहा ४ किलो तांदूळ व केवळ १ किलो गहू देण्यात येत होता. मात्र जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांना भातापेक्षा पोळीला अधिक पसंती असल्याने गव्हाचा पुरवठा वाढवावा, अशी मागणी सातत्याने होत होती. ही बाब जिल्हाधिकारी तसेच संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती, मात्र आतापर्यंत धान्यवाटपाच्या सूत्रामध्ये कोणताही बदल झाला नव्हता, आता या महिन्यापासून जिल्ह्यातील सर्व रेशन कार्डधारकांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ असा पुरवठा करण्यात येणार आहे. 

अमरावती जिल्ह्यात अंत्योदय योजनेतील १ लाख २९ हजार ४६६ कार्ड असून, त्यातील लाभार्थ्यांची संख्या सुमारे ३ लाख आहे. तसेच १४ही तालुक्यांतील प्राधान्य गटातील लाभार्थ्यांची संख्या १५ लाख ५६ हजार १६ इतकी आहे. अशा प्रकारे जिल्हाभरातील एकूण सुमारे १९ लाख लाभार्थ्यांना या नव्या धोरणाचा लाभ मिळणार आहे.

या नव्या वितरणासाठी राज्य सरकारतर्फे अमरावती जिल्ह्याला सुमारे १२ हजार २४२ मेट्रिक टन धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे वितरण प्रक्रिया अधिक सुलभ आणि परिणामकारक होणार आहे. या निर्णयामुळे तांदळाच्या चोरट्या विक्रीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असे मत निवृत्त नायब तहसीलदार सुरेश उंबरकर यांनी व्यक्त केले. अनेक लाभार्थ्यांना भात खाण्याची सवय नसल्याने रेशनमधील तांदूळ खुल्या बाजारात विकला जात होता. कुटुंबाला आवश्यक तेवढा तांदूळ ठेवून उर्वरित तांदूळ राईस मिलर्स किंवा छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना विकला जात असे. त्यामुळे महसूल व पोलीस विभागाला या गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. गव्हाचा पुरवठा वाढल्यामुळे नागरिकांना त्यांच्या आहारानुसार धान्य मिळेल, तसेच तांदळाची बेकायदेशीर विक्री थांबेल त्यामुळे प्रशासनावरील ताणही कमी होणार असून, संपूर्ण रेशन व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्याची शक्यता आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages