'अरुणोदय' मोहिमेद्वारे सिकल सेल धोक्याविरुद्ध लढा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, January 15, 2026

'अरुणोदय' मोहिमेद्वारे सिकल सेल धोक्याविरुद्ध लढा




दि. १६ अमरावती। (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):-
वृत्त प्रशासनाच्या ताज्या आकडेवारीने सिकल सेल आजाराचा गंभीर इशारा दिला असून १६ ते २० वयोगटात आणि २० वर्षावरील अविवाहित तरुण-तरुणींमध्ये सिकल सेल वाहकांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. सिकल सेल हा अनुवंशिक आजार असल्याने आजची निष्काळजीपणा उद्याच्या पिढीसाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे वेळेत तपासणी आणि जनजागृती हाच यावरचा प्रभावी उपाय असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 'अरुणोदय' ही विशेष सिकल सेल तपासणी मोहीम १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राज्यातील २१ जिल्ह्यांत राबविली जाणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रक्ततपासणी, समुपदेशन आणि जनजागृती केली जाणार असून भावी पिढीला या अनुवंशिक आजारापासून वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आकडेवारीनुसार १० वर्ष वयोगटात धारणी तालुक्यात ६६५ सिकल सेल वाहक व १८५ बाधित मुले आढळून आली आहेत, तर चिखलदऱ्यात ५८७ वाहक व ९९ बाधित मुले आहेत. ११ ते १५ वर्ष वयोगटात धारणीमध्ये ५९१ तर चिखलदऱ्यात ४२७ सिकल सेल वाहक रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी ग्रामीण आणि आदिवासी भागातील आरोग्यस्थितीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. २० वर्षांवरील लोकसंख्येत विवाहित तसेच अविवाहित व्यक्तीमध्येही सिकल सेल वाहकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. एकट्या धारणी तालुक्यात २० वर्षांवरील २,०५६ विवाहित व्यक्ती सिकल सेलचे वाहक असल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. ही बाब सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या अत्यंत चिंताजनक मानली जात आहे. राज्यपातळीवर आतापर्यंत १ कोटी ५ लाख ८६ हजार लोकांची सिकल सेल तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १२,४२० रुग्ण आणि तब्बल १ लाख २४ हजार २७५ वाहक आढळून आले आहेत. हे आकडे राज्यासमोरील सिकल सेलचे भयावह वास्तवअधोरेखित करतात. सिकल सेल वाहकांना स्वतः आजाराची लक्षणे नसली तरी त्यांच्या विवाहानंतर जन्मणाऱ्या अपत्यांना हा आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे विवाहपूर्व तपासणी, समुपदेशन आणि योग्य मार्गदर्शन अत्यावश्यक ठरते. 'अरुणोदय' मोहिमेच्या माध्यमातून हीच साखळी मजबूत करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आज तपासणी, उद्या सुरक्षित पिढी-या ध्येयाने राबविण्यात येणारी 'अरुणोदय' मोहीम ही केवळ आरोग्य तपासणी नसून, ती भविष्यातील महाराष्ट्राच्या निरोगी पिढीसाठी उभारलेली संरक्षणाची भक्कम भिंत ठरणार आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages