डॉ. कीर्ती पिंजरकर लिखित 'कौटिल्यप्रणीतसुशासन आणि प्रशासन तंत्र'पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन २४.१.२०२६ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, January 23, 2026

डॉ. कीर्ती पिंजरकर लिखित 'कौटिल्यप्रणीतसुशासन आणि प्रशासन तंत्र'पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन २४.१.२०२६

 



अमरावती, दि. २४: डॉ. कीर्ती राम पिंजरकर लिखीत पद्धगंधा प्रकाशन पुणेव्दारा प्रकाशित 'कौटिल्यप्रणीत सुशासन आणि प्रशासन तंत्र' या पुस्तकाचा आज शनिवारी (ता. 24 जानेवारी) सायंकाळी पाच वाजता श्री हरिचंद्र हॉटेल, तापडिया मॉल समोर, बडनेरा रोड येथे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. डॉ. कीर्ती पिंजरकर ह्या संस्कृत भाषेतील पीएचडीधारक असून शहरातील आदर्श प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. 

            या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला माजी पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय अध्यक्ष म्हणून तसेच रिध्दपूर मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अविनाश आवलगावंकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश मुगल विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. या प्रकाशन सोहळ्यात संस्कृत, भारतीय इतिहास आणि दक्षिण आशियाई धर्माचे अभ्यासक व संशोधक प्रा. हेमंत राजोपाध्ये प्रमुख वक्ते म्हणून, पद्यगंधा प्रकाशन, पुणेचे प्रकाशक अभिषेक जाखडे, सिध्दार्थ प्रकाशन, मुंबईचे प्रकाशक शिवाजी धुरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या ग्रंथात समाविष्ट काही विषय :

नंदवंशाच्या कुलोच्छेदासोबतच, पारंपारिक अंधविचारांचे विच्छेदन करीत नव्या सडेतोड तत्त्वज्ञानासह कौटिल्याने 'बहुजनहिताय बहुजनसुखाय' अशी नवीन राज्यव्यवस्था निर्माण केली. दृढमूल प्रशासन यंत्रणा, अर्थव्यवस्थेचे पुनर्गठन आणि प्रजाजनांचे सामाजिक अधिकार निर्धारित करणारे सिद्धांतशास्त्र-'अर्थशास्त्र' कौटिल्याने युगभान राखून लिहिले. मौर्यांच्या बलाढ्य केंद्र सत्तेच्या-नियंत्रित सचिवालयात राजतंत्राच्या संचलनासाठी त्याने कार्यपालिका अर्थातच तत्पर प्रशासन व्यवस्था साकारली यावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला आहे.

या ग्रंथात इतिहासकालीन स्थानिक प्रशासनाचा यशस्वी प्रयोग, प्रशासनात अरण्यवासीय तथा तृतीयपंथीयांचा सहभाग, सनदी नोकरवर्ग-बदली, पदोन्नती, सेवा समाप्ती, निवृत्तीवेतन, शासकीय सेवेत असताना मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना निर्वाह वेतन, कृषी क्षेत्र विकासावर भर आणि गरजू शेतकऱ्यांना मदत करणे हे राज्यकर्त्याचे कर्तव्य, शूद्रांचे अवस्थांतर-सैन्य व शेतीत प्रवेश, आदर्श कर प्रणाली, भ्रष्टाचार निर्मूलन- भ्रष्टाचाराच्या ४० प्रकारांचे सूक्ष्म विवेचन, तंत्रज्ञानाचा अवलंब, स्त्रियांना विवाह विषयक व आर्थिक अधिकार, स्वावलंबन, स्वेच्छामृत्यू, गर्भपात, आत्महत्या, समलिंगी संबंध, अन्नभेसळ, बनावट चलन, बनावट माल, ब्रँडची नक्कल, वेठ बिगार, देह व्यापार, आपत्ती व्यवस्थापन, वाहन चालक परवाना इत्यादी आधुनिकोत्तर विषयांसंबंधी कायदे, धार्मिक प्रश्नांपेक्षा भौतिक गरजांना प्राधान्य, वस्तुस्थितीचे अनुसरण, भौतिक सिद्धीचे मार्गदर्शन आदर्श मंत्रालये व संबंधित खात्याच्या विद्येचा सखोल अभ्यास केलेल्या मंत्र्याच्या नेमणुका, विद्याविनीत, प्रजानुरक्त शासक- राज्याचा उपभोग शून्य स्वामी, अव्यवस्था संपुष्टात आणून सामाजिक प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या विवेकपूर्ण राजनीतिचा शासकाला उपदेश या महत्वपूर्ण विषयांचा समावेश असून याशिवाय अनेक अभिनव संकल्पना, काटेतोल न्याय, उदात्त राजधर्म, प्रामाणिक राजकारण, व्यवहार शुचिता... काळाची गरज म्हणून समजून घेण्यासाठी 'कौटिल्यप्रणीत सुशासन आणि प्रशासन तंत्र' वाचकांनी वाचावे तसेच या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन लेखिकेव्दारे करण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages