Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

विशेष लेख,:- स्वप्नात आल्या सावित्रीबाई ...!!



दि. ३ :- ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क:-

स्वप्नात आल्या सावित्रीबाई, लेकींविषयी त्यांना जाणून घ्यायची होती घाई, मी म्हटलं तूम्ही त्या काळी दगड धोंडे पेलले शिव्या शाप झेलले म्हणून तूमच्या लेकी आज आभाळभर मिरवतात.कंम्प्यूटर शी खेळतात,तूमच्या मुळं लेकींचं अस्तित्व निर्माण झालंय प्रत्येक क्षेत्रात लेकीने आपलं पद मिळवलंय, हरणार नाही लेकी तूमच्या हाच त्यांचा निर्धार आहे, बुरसटल्या जीर्ण रूढींना मोडीत त्या काढत आहे. पण एक सांगू सावित्रीबाई तूम्ही नसत्या तर..?? ही कल्पना करताचं काळीज करपायला होतंय. 

आज तूमचा जयंती उत्सव तूम्हाला मी नतमस्तक होते. 

स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तूम्ही घेतला होता.

सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी स्त्री उद्धारासाठी तूमचा जन्म झाला. अवघ्या ९ वर्षांच्या असतानाचं इस १८४० मध्ये १३वर्षे वयाच्या ज्योतिबा फुले यांच्याशी तूमचा विवाह झाला. आज ९ वर्ष वयाच्या मुली खेळण्या-बागळण्यात दंग राहून आम्ही देखील त्यांचे लाड कोड पुरवण्यात गुरफटलेलो असतो. लहानपणापासून जातीयतेचे चटक्यात होरपळलेल्या अस्पृश्याचे हाल पाहून ज्योतिबांचे काळीज पिळवटून निघत असतांना अमानुष रुढी-परंपरा व कर्मकांडाविरुद्ध ज्योतिबांचे मन पेटून उठले. ज्योतिबांच्या क्रांतीकारी विचारांना सावित्रीबाई तूमची खरी साथ मिळाली.आज या वयातली पोरी पोर वैचारीक पातळी उंचावू शकेल का? जमीनीची पाटी अनं काडी ची लेखनी करून तूम्हाला ज्योतिबांनी शिक्षित केले.जिद्दीने तूमचे शिक्षण घेणे म्हणजे आम्हा महिलांच्या जीवनात तेजोमय प्रकाश आणण्याचे रणशिंगच जणू फुंकले होते. 

व्रतवैकल्य करून चंद्रासारख्या ताऱ्याचं पुजेचं थोटांड मांडलेल्या जगात स्त्री च्या हाती लेखनी देवून तूम्ही तीला शिक्षण घेवून चंद्रावर जाण्याचा मार्ग दावला, मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देत  १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून ज्योतिबा आणि तूम्ही प्रथम शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जर तूम्ही लेकींसाठी शिक्षणाच्या क्रांतीचा धागाचं पकडला नसता तर आजही त्या खितपत पडलेल्या विचारांमध्ये आम्ही लेकी भरडत राहीलो असतो. धर्ममार्तंडांनी ‘धर्म बुडाला’ अशी ओरड केली तरीसुद्धा  तूम्ही मागे हटल्या नाहीत.विद्येची आराध्यदैवत माँ सरस्वती नसून माय सावित्रीबाई तूम्ही आहात हेच प्रत्येकाच्या मनात कोरायचा आमचा प्रयत्न आहे. ज्योतिरावांच्या वडिलांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे ज्योतिरावांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले. वयाच्या १९व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांना घराबाहेर पडणे भाग पडले. अशाही परिस्थितीत तूम्ही न डगमगता लढा दिला . ज्योतिरावांच्या कार्यात तूमची पूर्णपणे साथ देण्याची तयारी होती. समानता ही केवळ लिहीण्याची - बोलण्याची बाब नाही तर ती कृतीत उतरली पाहिजे हे ज्योतीरावांचे ब्रिद तूम्ही जोपासले होते.इस १८४८ ते १८५२पर्यंत तूम्ही एकूण १८ शाळा काढल्या. त्यांच्या शाळेची नोंद सरकारी दफ्तरात झाली तेव्हा १२ फेब्रुवारी १८५२ मध्ये मेजर कॅन्डी यांच्या हस्ते तूमचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळांना सरकारी अनुदान जाहीर केले.आज शिक्षणाचे बाजारीकरण होवून विद्येला विकले जात असल्याचे आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत आहोत.हे आमचं दुर्दैवचं. शिक्षणाची महती गाताना सावित्रीबाई तूम्ही

"विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून असं म्हणतं तूम्ही शिक्षणाशीवाय स्त्रीजातीला तरणोपाय नाही हे दाखवून दिले. परंतू वटसावित्री दिनी सत्यवानाच्या सावित्रीचे पुजन करणाऱ्या, वैभवलक्ष्मी सारखे अनेक व्रत करणाऱ्या आणि काहितरी आनंदाची बातमी मीळेल असा गैरसमज बाळगून दहा लेकींना मेसेज पाठवणाऱ्या अशा सुशिक्षीतपणाची फक्त शाल पांघरलेल्या काही लेकींना बघून सावित्रीबाई तूमचे हृदय नक्कीचं हेलावत असेल या लेकींना आजही सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा फुलेंची सावित्री समजून घेणे गरजेचे आहे. 

त्याकाळी बालविवाहामुळे अनेक मुली गरोदर असताना विधवा झाल्या. त्यांच्याकरिता तूम्ही दोघांनी ही १८६३ रोजी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक प्रसूतिगृहही सुरू केले. केशवपनाविरुद्ध नागरिकांना संघटीत करून नाभिकांचा संप घडवून आणण्याचा कल्पक उपक्रम कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी केला. त्यामागची प्रेरणा सावित्रीबाईंचीच होती. इतकेच नव्हे तर विधवा आईच्या पोटी जन्म घेणाऱ्या यशवंतला दत्तक घेऊन तूम्ही त्याला डॉक्टर केले.आजच्या आधुनिक युगातील बोटावर मोजण्याइतक्या स्त्रीया सोडल्या तर आपल्या पतीने कुणी गरजू महिलेला मदत दिली  तर सहन होत नाही.आपल्या तोंडाचा पट्टा चालवत शिव्याशापाचा भांडोळा वाहिल्याखेरीज राहत नाही तर दुसरीकडं मुल दत्तक घेण्याच्या नावावर देखील अनेकांचा पारा चढून समदं घर डोक्यावर घेतलं जात हे वास्तव आहे.

जुलै १८८७मध्ये ज्योतिरावांना पक्षाघाताचा आजार झाला. त्याचे उजवे अंग लुळे पडले. त्यांच्या आजारपणात सावित्रीबाईं तूम्ही त्यांची अहोरात्र शुश्रुषा केली. २८ नोव्हेंबर १८९० रोजी ज्योतिरावांचे त्या आजारात निधन झाले. अत्यंयात्रेच्यावेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावाचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध करू लागले. त्यावेळेस तूम्ही धैर्याने पुढे येवून स्वत:हा टिटवे धरले. अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्या व स्वत:च्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यशवंतराव हा विधवेचा मुलगा असल्याने त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते. तेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांच्या राधा नावाच्या मुलीशी ४ फेब्रुवारी १८८९ रोजी विवाह यशवंतचा करून दिला. हाच महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होय.

त्या काळी सावित्रीबाई तूम्ही आंकरजातीय विवाहास परवानगी दिली आणि आज तर आधुनिक असल्याचे ढोंग करणारे स्वत:हाला सुधारले समजणारे गैरसमज ठेवणारे आंकरजातीय विवाहाला मोळ घालतात आणि जर झालचं तर पोटच्या गोळ्याला 

संपवायला मागं पुढं बघत नाही यांना काय म्हणावं ?

२४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर ज्योतिरावांच्या निधनानंतर सत्यशोधक चळवळीचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी सावित्रीबाईंवर आली. १८९३ रोजी सासवड येथे झालेल्या ‘सत्यशोधक परिषदे’चे अध्यक्षपद सावित्रीबाईंनी भूषविले. आपल्या विचाराचा प्रसार तूम्ही आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ या काव्यरचना तूम्ही लिहिल्या.१८९७मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातला होता. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेत होता. त्यातून उद्भवणारे हाल ओळखून प्लेग पीडितांची सेवा करताना सावित्रीबाई तूम्हाला प्लेग झाला.

१० मार्च १८९७ रोजी वयाच्या ६६व्या वर्षी तूमची प्राणज्योत मालवली.आज कोरोना ने थैमान घातले आहे यात तूमच्या अनेक लेकी आत्मविश्वासाने सेवा देत आहे तर काहींनी आपल्या प्राणाच्या समिधा या आजाराशी लढा देत वाहिल्या आहे.सावित्रीबाई तूम्ही कायम आम्हा लेकींच्या ह्दयी विराजमान राहून आम्हाला स्फूर्ति देत आहातं. 


सौ. कंचन मुरके अमरावती

Post a Comment

0 Comments