खड्ड्यांमुळे शेतीमालाचे नुकसान; एकलासपूर-धामणगाव रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 26, 2025

खड्ड्यांमुळे शेतीमालाचे नुकसान; एकलासपूर-धामणगाव रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी

 


अचलपूर, दि. २७ नोव्हेंबर:
तालुक्यातील एकलासपूर ते धामणगाव गढी या सुमारे तीन किलोमीटरच्या शेतशिवारातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था लक्षात घेऊन शेतकरी आणि शेतमजूर बांधवांनी तहसीलदार, अचलपूर यांना निवेदन सादर केले आहे. गेल्या अनेक दशकांपासून दुर्लक्षित असलेल्या या रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची व्यथा निवेदनात मांडण्यात आली.
रस्त्याची सद्यस्थिती आणि समस्या
या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट असून, खोल खड्डे, सतत साचलेले पाणी आणि चिखलामुळे शेतात जाणे आणि शेतीमाल बाहेर काढणे कठीण झाले आहे. विशेषतः पावसाळ्यात हा मार्ग अक्षरशः जलमय होतो. परिणामी संत्र्यासह इतर शेतीमाल शेतातच सडतो, व्यापारी कमी भाव देतात आणि शेतीमाल वाहतुकीवर प्रचंड खर्च येतो.
  निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, या रस्त्यावर सुमारे १००० हेक्टर क्षेत्रातील शेती आणि २०० हून अधिक शेतकरी अवलंबून आहेत.
  यावर्षी अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतकरी आधीच संकटात आहेत, त्यात रस्त्याच्या कोंडीत भर पडत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
इतिहासदृष्ट्याही हा रस्ता महत्त्वाचा आहे. ब्रिटिशकालीन काळापासून हा मार्ग अचलपूर-धोतरखेडा-एकलासपूर-धामणगाव गढी-पिंपळखुटा-देवगाव-सातपुडा घाटमार्गे मोझरी, वैराट, गाविलगड किल्ला व चिखलदरा असा जात होता. या संपूर्ण मार्गातील बहुतेक रस्त्यांचे काम पूर्ण झाले असले तरी, मधील तीन किलोमीटर भाग अजूनही अत्यंत खराब अवस्थेत आहे.
शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला केलेल्या प्रमुख मागण्या:
  • या रस्त्याला तातडीने शासकीय निधी मंजूर करून काम पूर्ण करण्यात यावे.
  • खोल खड्डे भरून पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.
  • कृषीप्रधान भागातील वाहतूक सुरळीत करून शेतीमालाला बाजारपेठ मिळण्याचा मार्ग मोकळा करावा.
शेतकरी व शेतमजूर बांधवांनी प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली असून, हा रस्ता दुरुस्त न झाल्यास आणखी आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, असे म्हटले आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages