महाराष्ट्र हा मध्य प्रदेश राज्यातील आदिवासी गावांना जोडणारा शिरजगाव -खोमई नादुरुस्त रस्ता, पुलावरून ओव्हरलोड खाजगी बसेस ,गौण खनिज वाहतूक. - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 19, 2025

महाराष्ट्र हा मध्य प्रदेश राज्यातील आदिवासी गावांना जोडणारा शिरजगाव -खोमई नादुरुस्त रस्ता, पुलावरून ओव्हरलोड खाजगी बसेस ,गौण खनिज वाहतूक.

 

            


शिरजगाव कसबा- पाळा -खोमई मार्गे बैतूल मध्य प्रदेश या नादुरुस्त रस्ता पुलावरून ओव्हरलोड खाजगी बसेस, गौण खनिज वाहतूक सुरू असून बांधकाम विभाग ,महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने या मार्गावर सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.

शिरसगाव कसबा  डींगाबर सुने  दिनांक १९(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :  

शिरसगाव कसबा पाळा ते खोमई हा ६ किलोमीटर मार्ग असून महाराष्ट्रातील पाळा व मध्य प्रदेश खोमई या २ आदिवासी गावांना जोडणारा रस्ता आहे.या खोमई गावां नजीक मेघा नदीवरील पूल  १० वर्षा अगोदर महापुराने क्षतीग्रस्त झाला असून वाहने यावरून जाऊ शकत नाही. याबाबत १७ जून २०२५ ला ग्रामीण उदय ने वृत्त प्रसिद्ध केलेले होते  मेघा नदीवरील पुलाची झालेली अत्यंत दुरवस्था हा हजारो आदिवासींच्या जीवनातील रोजचा धोका बनला आहे, तरीही प्रशासनाचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

खोमई सरपंचाने लोकवर्गणीतून तात्पुरती माती टाकून दुचाकी वाहना करता पुल दुरुस्त केलेला होता परंतु यावरून  परतवाडा बैतूल मार्गावरच्या खाजगी बसेस शिरसगाव कसबा मार्गे येऊन या रस्त्यावरून जात आहे. तर बैतूल  व आठनेर मार्गावरील अवैध वाहतूक या मार्गावरून होत आहे. या मार्गावरून महसूल रॉयल्टी  वाचवण्यासाठी गौण खनीज  अवैधरित्या ओव्हरलोड ट्रक मधून केली जात आहे. गौण खनिज वाहून नेत असताना त्यावर ताडपत्री न झाकल्यामुळे सर्वत्र धुळीने रस्त्यालगतची पिके नष्ट होत असून मध्ये लागणाऱ्या गावातील नागरिकांना श्वसनाचे आजार झाले आहे.

 शिरसगाव कसबा ते पाळा या मार्गावर २ वर्षा अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाने २ की.मि. डांबरीकरण दुरुस्ती ७० लाखाचे काम केले आहे. या ओव्हरलोड वाहनाने ते पूर्ण नष्ट झाले आहे. २०२३-२०२४ मध्ये अमरावती जिल्हा नियोजन समिती बांधकाम विभाग बजेट मध्ये या रस्त्यावर १ कोटी रुपये मंजूर असून निविदाही मंजूर आहे परंतु निधी नसल्यामुळे कंत्राटदार काम करीत नाही. या मार्गावर "ब" वर्ग तीर्थस्थळ शीतला माता मंदिर आहे. 

पूल अनेक वर्षांपूर्वी बांधलेला असून, तो आता पूर्णपणे जीर्ण झाला आहे. पुलाचे दगड आणि सिमेंटचे भाग ठिकठिकाणी कोसळले आहेत. पावसाळ्यात मेघा नदी दुथडी भरून वाहते. अशा वेळी पाणी थेट तुटलेल्या पुलाच्या वरच्या भागातून वाहत असल्याने, नागरिकांना जीव मुठीत धरून पाण्यातून वाट काढावी लागते. खोमई भागातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी महाराष्ट्रातील पाळा किंवा शिरजगाव कसबा येथे येतात. त्यांचा हा प्रवास दररोज जीवघेणा धोका घेऊन येतो.

  पावसाळ्यात महिला आणि लहान मुलांना शाळेत किंवा दवाखान्यात घेऊन जाणे म्हणजे साक्षात यमराजाच्या दारात जाण्यासारखे आहे.या भागातील आदिवासी नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पुलाच्या दुरुस्तीसाठी व नवीन बांधकामासाठी निवेदने दिली आहेत. 

 जीर्ण झालेल्या या पुलावरून अवजड वाहनांची ये-जा वाढल्यास मोठा अपघात होण्याची आणि जीवितहानी होण्याची शक्यता आहे. दोन्ही राज्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाने या समस्येचे गांभीर्य ओळखून त्वरित पाऊले उचलणे आवश्यक आहे.

या रस्त्याचे व पुलाचे कामाबाबत १ वर्षा अगोदर केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व अमरावती पालकमंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांना मनोहर सुने माजी जि प सभापती यांनी निवेदन दिले असता रस्ता व पुल सर्वे कामाचे आदेश त्यांनी दिलेले होते. परंतु अद्यापावेतो बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी या मार्गाची दखल घेतलेली नाही. या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे दरमहा दुचाकी चालकाचे अपघात होत आहे. अमरावती जिल्ह्याचे खासदार व अचलपूर आमदार यांनी या महत्त्वाचे कामावर तरी लक्ष द्यावे अशी प्रवाशाची व नागरिकांची मागणी आहे. 






  



     

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages