Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जन्मजात अंध माला होणार महसूल सहायक पदावर रुजू







*आज मिळणार नियुक्ती पत्र
*भारतातील पहिलीच घटना

अमरावती, दि. 4 (ग्रामिण उदय प्रतिनिधी) : वझर येथील दिव्यांग बेवारस बालगृहातील जन्मजात अंध असलेली  माला शंकर पापडकर महसूल सहायक पदावर रुजू होणार आहे. तिला नागपूर येथील कवीवर्य सुरेश भट्ट सभागृहात महसूल सहायक पदाचे नियुक्ती पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.

जन्मजात अंध व बेवारस मुलगी जिद्द, परिश्रम आणि सततच्या सरावाने जवळच्या व्यक्तीनी दिलेल्या साथीमुळे शासकीय पदी नियुक्त होत आहे. अशा प्रकारची ही भारतात पहिला घटना असावी. यामुळे मालाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जळगाव रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीत सापडलेली माला आज महसूल सहायक पदावर पोहचली आहे. माला शंकरबाबा पापळकर यांची ही एक विलक्षण आणि प्रेरणादायी कहाणी आहे.

अंध व बेवारस असलेल्या मालाला अमरावतीच्या वझर येथील दिव्यांग बेवारस बालगृहात आणण्यात आले. जिथे तिच्या जीवनात प्रकाश झाला तो म्हणजे पद्मश्री कर्मयोगी शंकरबाबा पापळकर यांच्यामुळे. त्यांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली. तिचे नाव 'माला' ठेवले. तिला केवळ आश्रयच नाही, तर ओळखही दिली. शिक्षणाची ओढ, वाचनाची आवड आणि शंकरबाबांचा आधाराने  माला शिकत गेली. ब्रेल लिपीतून दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही झाले.

जगण्यातील प्रत्येक पायरीवर मालासाठी कर्मयोगी शंकरबाबा पापळकर यांची साथ होती. अपंगत्वाच्या मर्यादा झुगारून तिने शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर २०१९ पासून तिने स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली. यात तिने २०२३ मध्ये एमपीएससी 'ग्रुप सी' मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. जन्मजात अंथ आणि बेवारस असलेली मुलगी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याची भारतातील ही पहिलीच घटना असावी. त्यामुळे हा क्षण सुवर्णाक्षरात लिहिला जाणार आहे.



Post a Comment

0 Comments