Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

भाषेला विशेष महत्व आहे, संरक्षण द्या -डॉ. मनिषा जाधव

 




अमरावती, दि. 04 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : मातृभाषा ही संवादाचे सर्वात श्रेष्ठ साधन आहे. सोबतच जगामध्ये असलेले ज्ञान प्राप्त करण्यासाठी मातृभाषेचा पाया पक्का असावा लागतो, त्यामुळे भाषेला विशेष महत्व आहे, हजारो वर्षांची परंपरा असलेल्या या भाषांना प्रत्येक नागरिकांने संरक्षण द्यावे, असे आवाहन मराठीच्या अभ्यासक डॉ. मनिषा जाधव यांनी केले.

जिल्हा नियोजन सभागृहात अभिजात मराठी भाषा दिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दाणेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, प्रसेनजित चव्हाण, ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी आदी उपस्थित होते.

डॉ. जाधव म्हणाल्या, मराठी भाषेचा उगम प्राकृत भाषेतून झाला असून संस्कृतचा ओलावा लाभला आहे. त्यामुळे ती एक सुसंस्कृत भाषा ठरली आहे. दोन हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास या भाषेला लाभला आहे. प्रत्येक कालखंडात उत्तम दर्जाचे मूळ साहित्य निर्माण झाले आहे. भविष्यात भाषेला टिकून राहावयाचे झाल्यास भाषेप्रती आत्मचेतना जागरूक ठेवणे गरजेचे आहे. राज्य कारभारात मराठीला राजभाषेचा दर्जा दिला आहे. यातून कार्यव्यवस्था उभी राहिली आहे.

भाषा तयार होण्यासाठी बोली भाषा महत्वाची आहे. अपभ्रंषामधून मैलागणीक विविध शब्द उगम पावले आहेत. ही शब्द दररोजच्या वापरात आल्याने रूळले आहेत. मराठीला दोन हजाराहून अधिक काळाचा इतिहास राहिला आहे. देवनागरी आणि मोडी भाषेतून असलेल्या या लिपीतून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, बहिणाबाई यांनी उत्तम साहित्य निर्माण केले. तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यकारभार मराठीतून चालविला. मातृभाषेतून संकल्पना स्पष्ट झाल्यास जगातील कोणत्याही भाषेतून ज्ञानार्जन करण्यास अडचण येत नसल्याचे सांगितले.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, मराठीला समृद्ध वारसा लाभलेला असल्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठीत सातत्याने अत्युच्च दर्जाचे साहित्य निर्माण झाले आहे. त्यासोबतच मराठी भाषा ही कालानुरूप प्रवाहित झाली आहे. वाचनसंस्कृती टिकल्यास लेखकांना प्रेरणा मिळणार आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेतील संशोधन कार्याला अनुदान मिळणार आहे. मराठीचा उगम झालेल्या रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ आहे. त्यामुळे मराठी भाषेतील सातत्य टिकवून ठेवण्यास प्रयत्न करावे, असे आवाहन केले.

डॉ. मडावी यांनी प्रास्ताविक केले. निरीक्षक अधिकारी चैताली यादव यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी आभार मानले.


Post a Comment

0 Comments